खानापूर तालुका क्रीडा स्पर्धेत ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाची चॅम्पियनशिप

खानापूर तालुका क्रीडा स्पर्धेत ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाची चॅम्पियनशिप

खानापूर : अभ्यासासोबतच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरीची परंपरा कायम ठेवत ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाने खानापूर तालुका क्रीडा स्पर्धेत चॅम्पियनशिप पटकावली. सरकारी पदवीपूर्व महाविद्यालय, मुगळीहाळ येथे झालेल्या या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी विविध क्रीडा प्रकारांत सरस कामगिरी करत महाविद्यालयाचे नाव उंचावले.

स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच ताराराणीच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व कायम ठेवले. कबड्डी आणि खो-खो या सांघिक क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवत संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तसेच 4×100 मीटर आणि 4×400 मीटर रिले या दोन्ही प्रकारांतही ताराराणीच्या संघांनी प्रथम क्रमांक पटकावला.

वैयक्तिक धावण्याच्या प्रकारात 100 मीटरमध्ये जयश्री गोडसेने द्वितीय, 200 मीटरमध्ये साक्षी देवलतकरने प्रथम, तर 400 मीटरमध्ये पल्लवी पाटीलने प्रथम क्रमांक मिळवला. 800 मीटरमध्ये अपेक्षा निलजकर प्रथम आणि लक्ष्मी हंगिरकर द्वितीय ठरल्या. 1500 मीटरमध्ये अपेक्षा निलजकरने प्रथम, तर 3000 मीटर फास्ट वॉकमध्ये स्वाती शिवटणकरने द्वितीय क्रमांक पटकावला.

मैदानी स्पर्धांमध्येही ताराराणीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. उंच उडीमध्ये प्रणाली पाटील प्रथम, तर लांब उडीमध्ये पल्लवी पाटील द्वितीय ठरली. तिहेरी उडीमध्ये पल्लवी पाटील प्रथम आणि प्रणाली पाटील द्वितीय राहिल्या. गोळाफेकमध्ये रेणुका गुरव प्रथम आणि आसमा मकानदार तृतीय, तर थाळीफेकमध्ये रेणुका गुरवने द्वितीय क्रमांक मिळवला. भालाफेकमध्ये मिनाक्षी गुरवने प्रथम क्रमांक पटकावला.

शारीरिक क्रीडा प्रकारांसोबतच बौद्धिक कौशल्यातही ताराराणीच्या विद्यार्थिनींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. बुद्धिबळ स्पर्धेत सानिका मेरवा आणि जोया सनदी यांनी प्रथम क्रमांक मिळवत महाविद्यालयाच्या यशात भर घातली.

विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाची दखल घेत करंबळचे सुपुत्र व खानापूरचे कापड व्यावसायिक महेश पाटील यांनी कबड्डी संघासाठी जर्सी देणगी दिली.

या यशाबद्दल संस्थेचे संचालक शिवाजीराव पाटील आणि ज्येष्ठ संचालक परशराम गुरव यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडूंना क्रीडा शिक्षक प्रशांत पांखरे, तसेच कोच भरमाजी पाटील आणि भीमसेन यांचे मार्गदर्शन लाभले.

महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले. तसेच प्रा. नरसाप्पा पाटील, मंगल देसाई, रुद्राप्पा मरीतम्णवर, सुनीता कणबरकर, तात्याजी जाधव, जयश्री शिवठणकर, पुंडलिक कर्लेकर आणि वनिता गावडे यांचे सहकार्य लाभले.

ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या या शानदार कामगिरीमुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen − 2 =

error: Content is protected !!