गृहलक्ष्मी योजनेच्या पैशांसाठी नातवाकडून आजीची हत्या; मृतदेह धरणाच्या पाण्यात फेकला, वडिलांनाही अटक

गृहलक्ष्मी योजनेच्या पैशांसाठी नातवाकडून आजीची हत्या; मृतदेह धरणाच्या पाण्यात फेकला, वडिलांनाही अटक

बेळगाव : गृहलक्ष्मी योजनेतून मिळणाऱ्या पैशांच्या वाटणीवरून झालेल्या वादातून २० वर्षीय नातवाने आपल्या ७८ वर्षीय आजीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना हुक्केरी तालुक्यातील अरळीकट्टी गावात उघडकीस आली आहे. हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी आरोपीच्या वडिलांनाही अटक केली आहे.

हम्मव्वा बाळाप्पा सनदी (वय ७८) असे मृत महिलेचे नाव असून भीमाप्पा रामाप्पा सनदी (वय २०) असे हत्या केल्याचा आरोप असलेल्या नातवाचे नाव आहे. तर रामाप्पा असे अटक करण्यात आलेल्या वडिलांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी हम्मव्वा या पाश्चापूर बाजारात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी जीनराळ गावाजवळील घटप्रभा धरणाच्या जलाशयात दोन पोत्यांमध्ये भरलेला त्यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहासोबत मोठे दगड बांधण्यात आले होते. याप्रकरणी त्यांच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून यमकनमरडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान, गेल्या साडेतीन वर्षांपासून आजीला मिळणाऱ्या गृहलक्ष्मी योजनेच्या आर्थिक मदतीतील हिस्सा नातू भीमाप्पा मागत असल्याचे समोर आले. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. याच कारणावरून १० नोव्हेंबर रोजी भीमाप्पा आजीला दुचाकीवरून घेऊन गेला होता. हुक्केरी तालुक्यातील गवीसिद्धेश्वर डोंगर परिसरात त्यांच्यात पैशांवरून वाद झाला. आजीने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने त्यांना जमिनीवर ढकलून दोरीने गळा आवळून हत्या केल्याचा आरोप आहे.

हत्येनंतर आरोपीने आजीच्या अंगावरील सोन्याची साखळी आणि २,३०० रुपये रोख रक्कम काढून घेतली. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून दुचाकीवरून नेला. दोन मोठे दगड बांधून मृतदेह घटप्रभा धरणाच्या जलाशयात फेकून दिला, जेणेकरून गुन्ह्याचे पुरावे नष्ट होतील, असा पोलिसांचा तपास आहे.

हत्या केल्यानंतर भीमाप्पा घरी परतला आणि त्याने वडील रामाप्पा यांना घटनेची माहिती दिली. मात्र, पोलिसांना माहिती देण्याऐवजी रामाप्पा यांनी गुन्हा लपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही अटक केली आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. यमकनमरडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून, पोलीस निरीक्षक जावेद एफ. मुशापुरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुन्ह्याचा छडा लावला. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ten + thirteen =

error: Content is protected !!