सद्गुरू श्री मधुसूदन साई स्वामींचे प्रेरणादायी मार्गदर्शन

सद्गुरू श्री मधुसूदन साई स्वामींचे प्रेरणादायी मार्गदर्शन

एसबीजी शिक्षण समूहातर्फे विशेष बौद्धिक व चर्चासत्राचे आयोजन

बेळगाव : एसबीजी शिक्षण समूहाच्या वतीने ‘वन वर्ल्ड – वन फॅमिली’ अर्थात ‘एक विश्व – एक कुटुंब’ या संकल्पनेचे शिल्पकार सद्गुरू श्री श्री मधुसूदन साई स्वामी यांच्या विशेष बौद्धिक व वार्तालापाचे मंगळवारी लव्ह डेल सेंट्रल शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले. यावेळी स्वामींनी उपस्थितांना उद्बोधक, उत्साहवर्धक आणि विचारप्रवर्तक मार्गदर्शन करत यशस्वी जीवनाचा कानमंत्र दिला.

“केवळ स्वतःसाठी यश मिळवणे हे खरे यश नाही, तर समाजाला काहीतरी देणे हेच खरे यश आहे. यश मिळवण्यासाठी पवित्रता, संयम आणि सातत्य या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत,” असे सद्गुरू श्री मधुसूदन साई स्वामी यांनी सांगितले.

निःस्वार्थ भावनेने कोणतेही सेवाकार्य केल्यास जीवन सार्थक ठरते. प्रत्येकाने समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी चांगले आणि निःस्वार्थ सेवाकार्य करावे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना सद्गुरूंनी समर्पक उत्तरे देत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एसबीजी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष एस. बी. घाटगे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षक विनायक मोरे व विद्यार्थिनींच्या सुश्राव्य गुरूवंदना प्रार्थनेने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

संस्थेचे चेअरमन राज घाटगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. “यश केवळ स्वतःपुरते मर्यादित ठेवण्यात नाही, तर समाजासाठी चांगले कार्य केल्यावरच खरे यश मिळते,” असे त्यांनी सांगितले.

यावेळी एसबीजी शिक्षण समूहाच्या वतीने एस. बी. घाटगे, राज घाटगे, अमित घाटगे आणि सागर घाटगे यांच्या हस्ते सद्गुरू श्री मधुसूदन साई स्वामी यांचा भावस्पर्शी हृद्य सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला सद्गुरू श्री मधुसूदन साई स्वामी यांचे अनुयायी, शहरातील निमंत्रित उद्योजक, एसबीजी शिक्षण समूहाच्या सर्व संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन दीपाली कुलकर्णी व अक्षता गाडेकर यांनी केले. प्राचार्या लक्ष्मी इंचल यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × five =

error: Content is protected !!