बेळगाव : शास्त्रीनगर, गुडशेड रोड, संतसेना रोड, आथले गल्ली, कपिलेश्वर कॉलनी आणि परिसरातील रहिवाशांनी गुडशेड रोडच्या गेल्या जवळपास सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करत जिल्हाधिकारी, बेळगाव यांना निवेदन सादर केले.
गुडशेड रोडची गेल्या सात वर्षांपासून अत्यंत खराब अवस्था असून, याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार अर्ज, विनंत्या आणि पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, अद्यापपर्यंत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नव्हती.
रहिवाशांच्या निवेदनाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी १२ ते ३ या वेळेत स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तावित पाहणीपूर्वीच आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी महापालिका प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने गुडशेड रोडचे खुरडणे व समतलीकरण सुरू केले. त्यामुळे रहिवाशांना काही प्रमाणात तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
मात्र, अनेक महिन्यांपासून सातत्याने मागणी करूनही कारवाई न झाल्यानंतर आता अचानक काम सुरू झाल्याबद्दल रहिवाशांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीपूर्वीच ही कार्यवाही का करण्यात आली, असा सवालही करण्यात येत आहे.
उशिरा का होईना, महापालिका प्रशासनाने रस्त्याच्या समस्येकडे लक्ष देत प्राथमिक स्वरूपाची कार्यवाही सुरू केल्याबद्दल रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, जेसीबीच्या माध्यमातून करण्यात आलेले समतलीकरण हा केवळ तात्पुरता उपाय असून, गुडशेड रोडसाठी कायमस्वरूपी आणि शास्त्रीय पद्धतीने रस्त्याची पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढील अनेक वर्षे नागरिकांना खराब रस्त्याचा त्रास सहन करावा लागू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गुडशेड रोडला तात्पुरता नव्हे, तर कायमस्वरूपी तोडगा मिळावा आणि नागरिकांना सुरक्षित व सुस्थितीतील रस्ता मिळावा, अशी रहिवाशांची ठाम मागणी आहे.
