बस सेवा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा; खानापूर तालुक्यात विद्यार्थ्यांची गैरसोय

बस सेवा सुरळीत न केल्यास आंदोलनाचा इशारा; खानापूर तालुक्यात विद्यार्थ्यांची गैरसोय

खानापूर : शाळा आणि महाविद्यालयांना नुकतीच सुरुवात झाल्यानंतरही खानापूर तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांमध्ये अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बस सेवा तातडीने सुरळीत करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी परिवहन विभागाला निवेदन सादर केले असून, मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

ग्रामीण भागातील अनेक मार्गांवर वेळेवर बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेत पोहोचणे कठीण होत आहे. तसेच सायंकाळी घरी परतताना दीर्घकाळ बसची प्रतीक्षा करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. अनेक मार्गांवर बसांची संख्या अपुरी असल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून गर्दीच्या बसमधून प्रवास करावा लागत असून, काही ठिकाणी बसच्या दरवाजाला लटकून प्रवास करण्याची वेळ येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रस्त्यांची दयनीय अवस्था आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक यामुळे अपघाताचा धोका वाढला असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात खानापूर–बेळगाव मार्गावरील बसफेऱ्या वाढविणे, तसेच गणेबैल, इदलहोंड आणि निदुर या गावांमध्ये खानापूर आगाराच्या सर्व बसांना थांबा देण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय खानापूर–लोंढा, खानापूर–बिडी, खानापूर–जांबोटी, खानापूर–गर्लगुंजी, खानापूर–हेमाडगा, खानापूर–कणकुंबी आणि खानापूर–हलशी या महत्त्वाच्या मार्गांवरील बससेवेतील समस्या तातडीने सोडविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

परिवहन विभागाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

निवेदन देताना शंकर गावडे, बाळकृष्ण पाटील, श्री पाटील, मुकेश गुरव, श्रावण गोडसे, भारत पाटील, शुभम कांबळे, साईनाथ मलिक, आदित्य कांबळे, राम चिक्कलकर, श्रेयर हलियाळकर आणि एकनाथ गावडे आदी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × three =

error: Content is protected !!