बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्यायाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र शासनाने पुन्हा एकदा हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे.
काही दिवसांपूर्वी डॉ. उदय सामंत यांनी बेळगाव दौऱ्यादरम्यान मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची भेट घेतली होती. यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सीमा प्रश्न, मराठी भाषिकांवरील अन्याय, भाषिक सक्ती तसेच विविध प्रशासकीय अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली होती.
या पार्श्वभूमीवर डॉ. उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आपल्या उपस्थितीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याची विनंती केली आहे.
यासंदर्भातील पत्राची प्रत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनाही पाठविण्यात आली असून, सीमा प्रश्नावर राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत असल्याचे संकेत या पत्रातून मिळत आहेत.
