मराठी शाळा टिकविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण

मराठी शाळा टिकविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण

हलशी (ता. खानापूर), दि. २४ जुलै : मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी मराठी शाळा टिकविणे ही काळाची गरज असून त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगावच्या वतीने खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रमाचा शुभारंभ गुरुवारी हलशी येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना अकलिपी, वह्या, पेन, पेन्सिल किट तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माऊली सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील, अनंत देसाई आणि प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि मराठी माध्यमाच्या शाळा अधिक सक्षम करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यकर्ते मिलिंद देसाई यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, समितीतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे, मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. समाजातील दानशूर व्यक्ती आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम सातत्याने यशस्वीपणे राबविता येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देण्याचा सल्ला दिला. ग्रामीण भागातील मराठी शाळा टिकविण्यासाठी पालक, शिक्षक, माजी विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक एस. टी. पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला. शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सहशिक्षिका वैशाली माळवी, जी. व्ही. भाले, वीणरसु, शोभा हजारे, शैला कालकुंद्रीकर यांच्यासह शिक्षक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

चौकट

हलशीवाडी व गुंडपी शाळांमध्येही साहित्य वितरण

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे हलशीवाडी आणि गुंडपी येथील सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात संबंधित शाळांचे मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई आणि विनायक फंडी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समितीचा हा उपक्रम मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच मराठी शिक्षण बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 1 =

error: Content is protected !!