महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे इदलहोंड, गणेबैल शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे इदलहोंड, गणेबैल शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

मराठी शाळा टिकविण्यासाठी समाजाने पुढाकार घ्यावा; विद्यार्थ्यांना मातृभाषेतील शिक्षणासाठी प्रोत्साहन

खानापूर : मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेचे जतन करण्यासाठी मराठी शाळा टिकविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने इदलहोंड आणि गणेबैल येथील मराठी प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

शनिवार (२५ जुलै) रोजी झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांना अक्षरलिपी, वह्या, पेन, पेन्सिल किट तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य देण्यात आले. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, मराठी शाळांतील पटसंख्या वाढावी आणि शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने युवा समितीतर्फे गेल्या नऊ वर्षांपासून दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.

यावेळी सीमाभागातील मराठी शाळा अधिक सक्षम करण्यासाठी पालक, शिक्षक आणि सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याचे आवाहन युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले.

इदलहोंड मराठी प्राथमिक शाळेत कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक अरुण पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. युवा समितीचे सहकारी मुकेश गुरव यांनी उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष व्यंकटेश पाटील, सदस्य सागर पाटील, बाळाराम चोपडे आणि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले.

गणेबैल मराठी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका रंजना देसाई यांनी स्वागत केले. युवा समितीचे सहकारी शुभम कांबळे आणि प्रसन्न पाटील यांनी मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत समितीच्या उपक्रमाची माहिती दिली. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सागर कवठणकर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या दोन्ही कार्यक्रमांना शाळांतील शिक्षकवृंद, ग्रामस्थ तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे श्री पाटील, साईनाथ मळीक, तुषार देसाई, कृष्णा खांबळे यांच्यासह अनेक सहकारी उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × two =

error: Content is protected !!