बेळगाव, दि. ११ : शहरातील महाद्वार रोड परिसरातील आष्टेकर गल्ली येथे एका नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत महिलेची ओळख रक्षिता पुजारी (वय २९) अशी झाली असून, तिचा विवाह मंजुनाथ कृष्णा पुजारी यांच्याशी अवघ्या महिनाभरापूर्वी झाला होता. रक्षिता एका खासगी कंपनीत कार्यरत असून ती घरातूनच (वर्क फ्रॉम होम) काम करत होती.
माहितीनुसार, ९ जून रोजी सकाळी रक्षिताने आपल्या आईशी दूरध्वनीवर संपर्क साधून ती माहेरी येणार नसून पतीच्या घरीच राहणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दिवसभर तिच्याशी संपर्क होऊ न शकल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने ते तिच्या सासरी गेले.
घराचा दरवाजा आतून बंद असल्याने संशय बळावला. खिडकीतून पाहिल्यानंतर रक्षिता ओढणीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी दरवाजा उघडून पाहणी केली असता रक्षिताचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक तपासात ती सासरी सुखाने राहत असल्याची माहिती समोर आली असली तरी, नेमक्या कोणत्या कारणामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. :::
