जटगे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेश आगमन सोहळा उत्साहात

जटगे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेश आगमन सोहळा उत्साहात

सामाजिक बांधिलकी जपत दिवंगत ग्रामस्थांना श्रद्धांजली; उद्योजक संजय नांदोडकर यांच्याकडून यंदाची गणेशमूर्ती भेट

जटगे : प्रतिनिधी

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जटगे यांच्या वतीने यंदाचा ३३ वा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही टाळ-मृदंगाच्या गजरात, गणरायाच्या जयघोषात गणेशमूर्तीचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला.

यंदाच्या गणेशमूर्तीची भेट जटगे गावचे सुपुत्र तथा उद्योजक श्री. संजय नांदोडकर यांनी मंडळाला दिली आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. सदर आकर्षक गणेशमूर्ती मूर्तिकार कु. संदेश सुतार यांनी साकारली आहे.

दरम्यान, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि आपुलकी जपणारा उत्सव असावा, या भावनेतून मंडळाने यंदाही सामाजिक उपक्रमाला प्राधान्य दिले आहे. मागील वर्षभरात जटगे गावातील ज्या ग्रामस्थांचे दुःखद निधन झाले, त्यांच्या स्मृतींना उजाळा देत मंडळाच्या वतीने सर्व दिवंगत ग्रामस्थांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी नुकतेच दुःखद निधन झालेले भारतीय सैन्य दलातील सैनिक तसेच मंडळाचे कार्यकर्ते युवराज मळीक आणि त्यांच्या पत्नी यांनाही मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. आपल्या गावातील व्यक्तींच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या आठवणी जपण्याचा मंडळाचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावला.

धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक संवेदना आणि माणुसकीची जपणूक करणाऱ्या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जटगे यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − four =

error: Content is protected !!