रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्रामतर्फे अनगोळ येथील शासकीय मराठी शाळेत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव
गणेश चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम, बेळगाव यांच्या वतीने अनगोळ येथील शासकीय मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ३४ मध्ये गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तीचे आगमन करण्यात आले असून भक्तिमय वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी करण्यात आलेली सजावट विशेष आकर्षणाचा विषय ठरली. या सजावटीतून बेळगाव परिसरातील मराठी शाळांची तसेच सरकारी शाळांची घटती संख्या आणि त्यामागील विविध सामाजिक प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात आले. पालकांचा मराठी माध्यमाऐवजी इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल, उच्च शिक्षणाच्या अपेक्षा, आर्थिक अडचणी, शाळांमधील सुविधांचा अभाव, सरकारी शाळांकडे होणारे दुर्लक्ष आणि आवश्यक सरकारी पाठबळाचा अभाव यांसारख्या मुद्द्यांवर या सजावटीतून भाष्य करण्यात आले.

तसेच नवीन पिढी आपल्या मातृभाषेपासून दुरावत चालली असल्याची चिंताजनक बाबही या संकल्पनेतून अधोरेखित करण्यात आली. इंग्रजी माध्यमाकडे वाढणारे आकर्षण आणि त्याचा मराठी शाळांवर होणारा परिणाम याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका जयश्री पाटील, शुभांगी पाटील आणि रेखा चवती यांच्यासह रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्रामचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. गणेशमूर्तीची आरती व पूजा क्लबचे अध्यक्ष हर्षित कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी क्लबचे सचिव रोहित अंगोलकर, इमिजिएट पास्ट डीआरआर हर्ष परेश शिंदे तसेच पास्ट डीआरआर अनिकेत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक परंपरेचे जतन न करता मराठी भाषा, मराठी शाळा आणि मातृभाषेच्या संवर्धनाचा सामाजिक संदेश देण्याचा रोटरॅक्ट क्लब ऑफ वेणुग्रामचा हा उपक्रम उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
