बेळगाव : शहरातील मंडोळी रोड परिसरात हेरॉईनची विक्री करणाऱ्या एका आरोपीला बेळगाव शहर गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पथकाने अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सीसीबीला मंडोळी रोडवरील विजय ढाबा परिसरात एक व्यक्ती हेरॉईनची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक आणि पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपीची ओळख अप्ताब महंमद हनीफ अत्तार (रा. बेळगाव) अशी झाली आहे.
कारवाईदरम्यान आरोपीकडून सुमारे २ लाख ८० हजार रुपये किमतीचे १०५ ग्रॅम हेरॉईन (ब्राऊन शुगर), १० हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन, असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत आरोपीने हे अमली पदार्थ मुंबईतील एका व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, ही यशस्वी कारवाई करणाऱ्या सीसीबीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
