बेळगाव : पुढील पिढीला शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन करणे अत्यावश्यक असल्याचे मत जी.एस.एस. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी व्यक्त केले.
बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या संध्या किरण सेवा केंद्रामार्फत आयोजित ज्ञान व मनोरंजन कार्यक्रमात ते ‘पाणी हेच जीवन’ या विषयावर बोलत होते. सोमवारपेठ, टिळकवाडी येथील डॉ. निता देशपांडे डायबेटिस सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वास धुराजी होते. व्यासपीठावर दिल्ली येथील एम्स वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रख्यात शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. मंजुनाथ पोळ, उपाध्यक्ष के. एल. मजूकर, कार्यवाह सुरेंद्र देसाई तसेच सहकार्यवाह शिवराज पाटील उपस्थित होते.
यावेळी बोलताना आनंद मेणसे यांनी निसर्गावरील वाढते अतिक्रमण आणि काँक्रीटीकरणामुळे जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया मंदावत चालल्याची खंत व्यक्त केली. भूगर्भातील पाणीसाठा टिकवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असले तरी पाण्याच्या वाढत्या व्यापारीकरणामुळे भविष्यात गंभीर संकट निर्माण होऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
दरम्यान, डॉ. मंजुनाथ पोळ यांनी किडनी ट्रान्सप्लांट आणि मधुमेहावरील शस्त्रक्रिया यासंदर्भात मार्गदर्शन करून उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमात रविंद्रनाथ जुवळी आणि सुरेंद्र देसाई यांनी हिंदी गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. प्रारंभी अरुण धोत्रे यांनी प्रार्थना सादर केली.
सुरेंद्र देसाई यांनी प्रास्ताविक केले, तर विठ्ठल पोळ यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. विजय वाईगडे यांनी आभार प्रदर्शन केले.
