बेळगाव : महिला विद्या मंडळाच्या एमव्हीएम इंग्लिश मीडियम शाळेचे नामकरण करून तिला ‘प्रभाताई देशपांडे स्कूल’ हे नाव देण्याचा सोहळा गुरुवारी उत्साहात पार पडला. शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या प्रभाताई देशपांडे यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली.
या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. लीना भोमाज यांनी प्रभाताई देशपांडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “स्वप्न पहा आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सचोटीने व जिद्दीने प्रयत्न करा, असा संदेश हजारो विद्यार्थ्यांना देणाऱ्या प्रभाताई यांचे नाव आज शाळेला दिले जात आहे, हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भगवानदास कपाडिया होते. विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संस्थेचे चेअरमन ॲड. सचिन बिच्चू यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रभाताई देशपांडे यांच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या योगदानाची आठवण अनेक पिढ्या जतन करतील. “काही व्यक्ती आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवतात आणि अनेकांचे जीवन घडवतात. प्रभाताई त्यापैकीच एक होत्या,” असे ते म्हणाले.
संस्थेचे उपाध्यक्ष व माजी विद्यार्थी ॲड. विवेक कुलकर्णी यांनी संस्थेच्या ५५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. शाळेचा ५५ वा वर्धापनदिन आणि प्रभाताईंचा ९५ वा जन्मदिन या औचित्याने शाळेचे नामकरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रभाताईंनी विद्यार्थ्यांमध्ये रुजविलेली शिस्त, प्रामाणिकपणा आणि जीवनमूल्ये यांची आठवण करून देत त्यांनी आपल्या बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
प्रभाताईंचे पुतणे रोहित देशपांडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, कडक शिस्तीच्या पण मनाने अतिशय मृदू असलेल्या प्रभाताईंनी आपले संपूर्ण आयुष्य शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले हजारो विद्यार्थी आज देश-विदेशात विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत.
प्रमुख पाहुण्या डॉ. लीना भोमाज यांनी ४२ वर्षांपूर्वीच्या आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणी सांगत प्रभाताईंच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. महिला विद्यालयाने विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे तर भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि परंपरांचेही संस्कार दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाताईंनी सातत्याने प्रयत्न करत चारित्र्यसंपन्न पिढी घडविली, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास संस्थेचे सचिव राहुल फडके, ट्रस्टी अशोक पोतदार, अजित शानभाग, मधुकर परांजपे, संजीव अध्यापक, शोभा शानभाग, विजय आजगावकर, सागर पाटणेकर, प्रिया खटाव, डॉ. संजय पोरवाल, वैशाली केळुसकर, विवेक तिनईकर, मुख्याध्यापिका कविता परमाणिक यांच्यासह अनेक मान्यवर, माजी विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच शाळेच्या नव्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. याच प्रसंगी शाळेच्या नवीन बसचे आणि संस्थेच्या नूतन अद्ययावत कार्यालयाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
प्रभाताई देशपांडे यांच्या स्मृतींना अभिवादन करत आणि त्यांच्या कार्याचा गौरव करत संपन्न झालेला हा सोहळा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.
