बेधडक बेळगाव वृत्तसेवा | खानापूर
जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर खानापूर येथील म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या दसरा जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले. या विजयामुळे खानापूर तालुक्यासह यडोगा गाव आणि ताराराणी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बेळगाव, यळ्ळूर, कडोली, कंग्राळी, बैलहोंगल, सौंदत्ती आणि रामदुर्ग येथील खेळाडूंचे वर्चस्व असलेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ताराराणी महाविद्यालयाच्या संघाने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या संघात यडोगा गावातील विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश असून, त्या क्रीडा शिक्षक प्रशांत पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली खो-खोचे प्रशिक्षण घेत आहेत.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ताराराणी महाविद्यालयाच्या संघाचा सामना SSBG क्लब, परमानंदवाडी या बलाढ्य संघाशी झाला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात ताराराणीच्या मुलींनी ४-२ अशा फरकाने विजय मिळवत दसरा जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपले नाव कोरले. विशेषतः गंगा कुकडोलकर आणि लक्ष्मी हंगिरकर यांनी दोन्ही डावांत केलेल्या उत्कृष्ट व अभेद्य संरक्षणामुळे संघाच्या विजयात मोलाची भर पडली.
दरम्यान, महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी इतर सांघिक खेळांमध्येही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. नंदगड येथे झालेल्या जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत गायत्री गुरव व प्रणाली चुडयेकर, रामदुर्ग येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पल्लवी पाटील, दिव्या शिरोडकर व रेणुका गुरव, तर चंदरगी येथे झालेल्या खो-खो स्पर्धेत अपेक्षा निलजकर व लक्ष्मी हंगिरकर यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दसरा जिल्हास्तरीय स्पर्धेतील शानदार विजयामुळे ताराराणी महाविद्यालयाच्या खो-खो संघाची विभागीय स्तरासाठी निवड झाली असून, येत्या ३० सप्टेंबर रोजी बागलकोट येथे ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी संघाकडून जोरदार तयारी सुरू आहे.
विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू (हलगेकर), संचालक शिवाजीराव पाटील, परशुराम अण्णा गुरव, महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद लक्ष्मणराव पाटील, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रशांत पाखरे, यडोगा गावातील पालकवर्ग तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
ताराराणी महाविद्यालयाच्या या यशस्वी विद्यार्थिनींनी आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर जिल्हास्तरावर आपला ठसा उमटविला असून, आता बागलकोट येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेतही यशाची परंपरा कायम राखण्याचा निर्धार केला आहे.
