बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव
तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँक लि.चे संचालक मदन बामणे यांनी आपल्या संचालकपदाचा स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. गेल्या सुमारे १८ वर्षांपासून ते बँकेच्या संचालक मंडळावर कार्यरत होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहकारी बँकांमधील संचालकांच्या कार्यकाळासंदर्भातील लागू नियमांचा विचार करून तसेच बँकेचे हित आणि संस्थात्मक शिस्त लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले आहे.
२४ सप्टेंबर २०२६ रोजी बँकेच्या अध्यक्षांना उद्देशून दिलेल्या राजीनामा पत्रात मदन बामणे यांनी आपल्या दीर्घ कार्यकाळात बँकेच्या संचालक मंडळावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल सभासद, ठेवीदार, अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि सहकारी संचालकांचे आभार मानले आहेत.
आपला राजीनामा स्वीकारून बँकेच्या नोंदीमध्ये आवश्यक ती नोंद करावी आणि त्यानुसार पुढील कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
दरम्यान, तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेच्या प्रगतीसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत, बँकेने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
