पॅराग्वे येथे भारताचे प्रतिनिधित्व; विमानतळावर पुष्पहार घालून स्वागत
बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा स्केटर आणि केएलएस जीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी देवेन बामणे याची दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे शहरात आयोजित जागतिक स्केटिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून बेळगावात परतलेल्या देवेनचे विमानतळावर उत्साहात स्वागत करण्यात आले.
भुवनेश्वर, ओडिशा येथे झालेल्या निवड चाचणीत देवेनची स्पीड स्लालम प्रकारातून भारतीय संघासाठी निवड झाली होती. देवेन आणि साईराज हे गेल्या १२ वर्षांपासून स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. जागतिक स्पर्धेतील सहभागासाठी देवेनने रात्रंदिवस मेहनत घेतली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या या स्पर्धेत त्याने ११ वे स्थान मिळविले.
जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून बेळगावात परतलेल्या देवेनचे विमानतळावर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
यावेळी विमानतळाचे संचालक त्यागराजन, भाजप शहर सचिव नागराज पाटील, विनोद बामणे, ज्योती बामणे, अर्चना मेंडके, लीना कोरीशेट्टी, दयानंद अंकले, संगीता अंकले तसेच बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे पालक आणि स्केटर्स उपस्थित होते.
देवेनने जागतिक स्तरावर केलेल्या सहभागाबद्दल उपस्थितांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
