राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या सर्वेश व कुलदीपची चमकदार कामगिरी; ३ सुवर्णांसह १ रौप्य पदकाची कमाई

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या सर्वेश व कुलदीपची चमकदार कामगिरी; ३ सुवर्णांसह १ रौप्य पदकाची कमाई

बेधडक बेळगाव वृत्तसेवा | बेळगाव

पाँडिचेरी येथे आयोजित केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या सर्वेश पाटील आणि कुलदीप बिर्जे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या दोन्ही खेळाडूंनी एकूण ३ सुवर्ण आणि १ रौप्य पदकांची कमाई केली आहे.

या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील सुमारे ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत सर्वेश रुपेश पाटील याने दोन सुवर्णपदके पटकावली, तर कुलदीप बिर्जे याने एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले.

या दोन्ही खेळाडूंनी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे, विश्वनाथ येल्लूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव केला आहे. त्यांच्या या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, खेळाडूंची मेहनत आणि सातत्यपूर्ण सराव महत्त्वपूर्ण ठरला आहे.

या खेळाडूंना डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदुधर सीताराम तसेच त्यांच्या आई-वडिलांचे प्रोत्साहन लाभले.

राष्ट्रीय स्तरावर बेळगावच्या खेळाडूंनी मिळवलेल्या या यशाबद्दल क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक आणि पालकांकडून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + twelve =

error: Content is protected !!