जयपूर येथे ५८ वी सिनियर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात; देशभरातील १८० स्पर्धकांचा सहभाग
बेळगाव : प्रतिनिधी
राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित ५८ व्या सिनियर राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या अभय कश्यप याने दमदार कामगिरी करत ‘मिस्टर इंडिया २०२६’ स्पर्धेचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ हा मानाचा किताब पटकाविला. तर गुजरातमधील वापी येथील मनीष सरोज याने ‘मेन्स फिजिक्स २०२६’ या स्पर्धेचा ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ किताब जिंकला.
इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनच्या वतीने राजस्थानमधील जयपूर येथील निर्मला ऑडिटोरियम हॉलमध्ये या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशाच्या विविध राज्यांमधील शरीरसौष्ठवपटूंनी सहभाग घेतला. एकूण नऊ वजनी गटांमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत तब्बल १८० स्पर्धकांनी आपले कौशल्य आणि शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन केले.
देशभरातील नामवंत शरीरसौष्ठवपटूंच्या सहभागामुळे स्पर्धेत चुरस पाहायला मिळाली. अभय कश्यप याने उत्कृष्ट शरीरयष्टी, स्नायूंची ठेवण आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर ‘मिस्टर इंडिया २०२६’ चा सर्वोच्च किताब आपल्या नावावर केला. मनीष सरोज यानेही ‘मेन्स फिजिक्स २०२६’ प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करत विजेतेपद मिळविले.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी जयपूर येथील फिट लीग फिटनेस इक्विपमेंट यांनी सहकार्य केले. तसेच राजस्थान शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव श्री. शिवराम थापा यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
स्पर्धेसाठी इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे सचिव सुरेश कदम यांच्यासह बलबीर सिंग, अनिल अंबरोळे, मनोरंजन लोलिता, बावेश, अमरदीप, दिलीप मेंडिस, दर्शन सर, डॉ. बी. पी. रेड्डी, के. जी. राव, जोग किरण, रूपक विश्वास, टी. रामू, गुरुनाथ सर आणि मनोरंजन शर्मा यांनी पंच म्हणून काम पाहिले.
राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेमुळे देशातील शरीरसौष्ठव क्षेत्रातील गुणवंत खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले. अभय कश्यप आणि मनीष सरोज यांच्या यशामुळे त्यांच्या राज्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
