ऐन सणासुदीत साखरेच्या दराने गाठला ७० रुपयांचा टप्पा; जनतेच्या ताटातील गोडवा महागला

ऐन सणासुदीत साखरेच्या दराने गाठला ७० रुपयांचा टप्पा; जनतेच्या ताटातील गोडवा महागला

बेळगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर बेळगावच्या बाजारपेठेत साखरेच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या घरातील गोडवा महागला आहे. मागील आठवड्यात सुमारे ५० रुपये किलोपर्यंत असलेली साखर आता ७० रुपयांच्या पुढे पोहोचल्याचे स्थानिक बाजारातील ग्राहकांकडून सांगण्यात येत आहे. साखरेसोबतच गुळाच्या दरातही वाढ झाल्याने घरगुती ग्राहकांसह मिठाई, बेकरी आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही त्याचा परिणाम होत आहे.

देशभरात साखरेच्या दरात गेल्या काही आठवड्यांत मोठी तेजी दिसून आली आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, देशांतर्गत साखरेचे उत्पादन सुरुवातीच्या अंदाजापेक्षा कमी होऊन सुमारे ३०६ लाख टन राहण्याची शक्यता आहे. त्यातच सणासुदीच्या काळात मागणी वाढत असल्याने बाजारावर दबाव निर्माण झाला आहे. खराब हवामानामुळे ऊस उत्पादनावर झालेला परिणाम, घटता साठा, वाढती मागणी आणि बाजारातील साठेबाजीची शक्यता ही दरवाढीमागील प्रमुख कारणे असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

साखरेच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने व्यापाऱ्यांसाठी ४०० टनांची साठा मर्यादा लागू केली असून, १ सप्टेंबरपासून मोठ्या प्रमाणात साखर वापरणाऱ्या ग्राहकांना १५ दिवसांपेक्षा अधिक साठा ठेवण्यास निर्बंध घातले आहेत. साठेबाजी आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी साखर कारखान्यांमधील साठ्याची तपासणीही सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, देशांतर्गत बाजारातील पुरवठा वाढवण्यासाठी केंद्राने १० लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे आगामी काळात साखरेच्या दरावर काही प्रमाणात नियंत्रण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मात्र, सध्या बेळगावच्या बाजारपेठेत साखर आणि गुळाच्या वाढलेल्या दरामुळे ऐन सणासुदीत सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर अतिरिक्त भार पडला आहे. गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने दरवाढीवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − twelve =

error: Content is protected !!