खानापूर : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि रक्षणाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचे औचित्य साधून म. मं. ताराराणी पी. यू. कॉलेज, खानापूर येथे विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्यात स्वयंरोजगार, व्यावसायिक कौशल्य आणि आत्मनिर्भरतेची भावना निर्माण करणारा ‘राखी मेकिंग व विक्री उपक्रम’ उत्साहात पार पडला.
मराठा मंडळाच्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांच्या मार्गदर्शनाखाली, कॉलेजचे प्राचार्य अरविंद पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मराठा मंडळाचे संचालक शिवाजीराव पाटील यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव उपस्थित होते.
बेळगावच्या चित्रकला शिक्षिका लता नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेजच्या हिंदी विषयाच्या प्राध्यापिका मंगल देसाई तसेच विद्यार्थिनींना विविध प्रकारच्या आकर्षक, सुबक आणि पर्यावरणपूरक राख्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर विद्यार्थिनींनी रेडीमेड राख्या विकत घेण्याऐवजी स्वतःच्या कल्पकतेचा वापर करून रंगीबेरंगी रेशमी धागे, मणी आणि पर्यावरणपूरक साहित्याच्या साहाय्याने सुंदर राख्या तयार केल्या.
स्वतःच्या हाताने तयार केलेल्या राख्यांची विक्री करताना विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि स्वावलंबनाची भावना दिसून आली. विशेष म्हणजे, अभ्यासाचे कोणतेही नुकसान होऊ न देता विद्यार्थिनींनी आपल्या फावल्या वेळेत आणि विश्रांतीच्या क्षणांत हा उपक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केला. त्यामुळे शिक्षणासोबत वेळेचे व्यवस्थापन, श्रमप्रतिष्ठा, सृजनशीलता आणि व्यावसायिक कौशल्य यांचा सुंदर संगम या उपक्रमातून साधला गेला.
उपक्रमाचे नियोजन प्रा. मंगल देसाई यांनी केले, तर वाणिज्य विभागाचे प्राध्यापक व फायनान्स हेड पी. व्ही. कर्लेकर यांनी आर्थिक नियोजन, हिशोब आणि विक्री व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली.
या उपक्रमात प्रथम व द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी सोनी केरकर, चित्रा कुरबर, शुभांगी गावडा, फातिमा, मुक्ता अनगडकर, जी.एस. वैशाली गुरव, पौर्णिमा गावडे यांच्यासह अनेक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वतः तयार केलेल्या राख्यांची यशस्वी विक्री केली.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन. ए. पाटील, टी. आर. जाधव, सुनीता कणबरकर, जयश्री शिवटणकर, आर. व्ही. मरितमनवर, वनिता गावडे, नितीन देसाई, आर. पी. धबाले, सीमा पाटील आणि सातेरी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
प्राचार्य अरविंद पाटील यांनी रक्षाबंधनाचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींच्या कल्पकतेचे आणि कर्तृत्वाचे कौतुक केले. तसेच उपक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही अभिनंदन केले.
राखीच्या या रेशमी धाग्यांनी ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींना केवळ सृजनशीलतेचा आनंद दिला नाही, तर स्वयंरोजगार, उद्योजकता आणि महिला सक्षमीकरणाचा नवा मार्गही दाखवून दिला.
