बेळगावच्या ऋणानुबंधांचा उल्लेख करत शरद पवारांकडून डॉ. प्रभाकर कोरेंचा गौरव

बेळगावच्या ऋणानुबंधांचा उल्लेख करत शरद पवारांकडून डॉ. प्रभाकर कोरेंचा गौरव

पुणे : कर्नाटक लिंगायत एज्युकेशन (KLE) सोसायटीचे कार्याध्यक्ष, पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा पुण्यात लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित विशेष समारंभात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी डॉ. कोरे यांच्या शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक योगदानाचा गौरव करताना महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर बेळगावशी जोडलेले आपले आणि डॉ. कोरे यांचे ऋणानुबंधही आवर्जून अधोरेखित केले.

शरद पवार म्हणाले की, डॉ. प्रभाकर कोरे हे संसदेत आपले सहकारी होते. संसदीय कामकाजात अनेक वर्षे एकत्र काम करताना कोण कर्नाटकचा, कोण महाराष्ट्राचा किंवा अन्य राज्याचा, असा भेद कधी केला नाही. मात्र, बेळगावच्या प्रश्नाच्या बाबतीत आपली आणि डॉ. कोरे यांची भूमिका वेगळी राहिली, असे त्यांनी स्पष्ट केले.

“बेळगाव महाराष्ट्रात असावे यासाठी मी स्वतः बेळगावला जाऊन सत्याग्रह केला, मला अटक झाली. अनेकदा बेळगावला जाऊन महाराष्ट्राचा हक्क मांडला. दिवसभर एकीकरण समितीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन बेळगाव महाराष्ट्रात आणण्याची मागणी करायचो; मात्र रात्री मुक्कामासाठी डॉ. प्रभाकर कोरे यांच्या घरी जायचो,” असा किस्सा सांगत पवार यांनी दोघांमधील दीर्घकाळचे जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित केले.

“दिवसा कोरेंच्या भूमिकेला विरोध करायचा आणि रात्री कोरेंच्याच घरी राहायचे; मात्र यामुळे आमचे नाते कधीही दूर झाले नाही. हे नाते अनेक वर्षांपासूनचे असून जिवाभावाचे आहे आणि ते कधीही वेगळे होणार नाही,” असे शरद पवार यांनी सांगितले.

KLEच्या माध्यमातून शिक्षण-आरोग्य क्षेत्रात मोठे योगदान

डॉ. कोरे यांनी संसदेतून निवृत्ती घेतल्यानंतर आपली उर्वरित शक्ती संस्थांच्या माध्यमातून शिक्षण व समाजसेवेसाठी वापरण्याचा निर्णय घेतला, असे सांगत पवार यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.

KLEच्या माध्यमातून कृषी महाविद्यालये, कला-विज्ञान-वाणिज्य महाविद्यालये तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था उभारण्यात डॉ. कोरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः KLEच्या वैद्यकीय संस्थांमध्ये महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्ण महाराष्ट्राचा असो किंवा कर्नाटकचा, त्याच्यात भेदभाव न करता त्याचे दुःख दूर करणे हीच भूमिका KLEच्या वैद्यकीय संस्थांची असल्याचे पवार यांनी नमूद केले.

KLEचे कार्य केवळ कर्नाटकापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई आणि पुणे यांसह विविध ठिकाणीही विस्तारले असल्याचे त्यांनी सांगितले. या संस्थांच्या माध्यमातून डॉ. कोरे यांनी महाराष्ट्राशीही घट्ट ऋणानुबंध निर्माण केले आहेत, असे पवार म्हणाले.

लिंगायत समाजाच्या योगदानाचा गौरव

यावेळी शरद पवार यांनी महाराष्ट्रातील लिंगायत समाजाच्या विविध क्षेत्रांतील योगदानाचाही विशेष उल्लेख केला. शेती, उद्योग, सहकार आणि राजकारणात लिंगायत समाजाने उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूरचे माजी खासदार मडेप्पा बंडप्पा काडादी यांच्या सहकारी व साखर उद्योगातील योगदानाचा दाखला देताना पवार यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श आजही स्मरणात असल्याचे सांगितले.

तसेच उद्योगपती डॉ. निळकंठराव कल्याणी आणि भारत फोर्जच्या माध्यमातून कल्याणी कुटुंबाने देशाच्या औद्योगिक क्षेत्राला जागतिक स्तरावर मिळवून दिलेल्या प्रतिष्ठेचाही त्यांनी गौरव केला.

“कोरेंची सेवा म्हणजे मानवतेची सेवा”

डॉ. प्रभाकर कोरे यांचे शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील कार्य हे केवळ कर्नाटकापुरते मर्यादित नसून महाराष्ट्राशीही त्याचे घट्ट नाते आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी पुण्यात आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम महत्त्वाचा असल्याचे पवार यांनी सांगितले.

“कोरे साहेब, तुम्ही काम करत राहा. तुमची सेवा ही मानवतेची सेवा आहे. या कामामध्ये आम्हा सगळ्यांची साथ तुम्हाला आणि तुमच्या संस्थांना कायम राहील,” असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या माध्यमातून सीमाप्रश्नावर मतभेद असतानाही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सामाजिक, शैक्षणिक व मानवी नातेसंबंध कसे टिकून राहिले आहेत, याचेही दर्शन घडले. बेळगावच्या प्रश्नावर आपली भूमिका कायम ठेवतानाच डॉ. प्रभाकर कोरे यांच्याशी असलेले वैयक्तिक आणि सामाजिक ऋणानुबंधही शरद पवार यांनी यावेळी स्पष्टपणे मांडले.

“जय हिंद! जय महाराष्ट्र!” अशा शब्दांत शरद पवार यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 + seventeen =

error: Content is protected !!