बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तसेच सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती, पुणे विभागाच्या वतीने युवासेना प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मुंढवा गाव शाखेच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार आदित्य ठाकरे पुणे येथे आले असता त्यांची समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी सीमाप्रश्न, बेळगावमधील सद्यस्थिती आणि मराठी भाषिक जनतेला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक जनता न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. केंद्र आणि महाराष्ट्र सरकारने या प्रश्नावर ठोस भूमिका घेऊन सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
बेळगावमध्ये मराठी भाषिकांना दुय्यम वागणूक दिली जात असून मराठी पाट्या, मराठी शाळा आणि मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांवर आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले.
कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर कन्नड भाषेची सक्ती केली जात असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. याशिवाय महाराष्ट्रातील मराठी नेते आणि कार्यकर्त्यांना बेळगावात प्रवेशबंदी केली जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. सीमाभागातील मराठी जनतेवरील कथित दडपशाही थांबवून त्यांना भाषिक आणि सांस्कृतिक हक्क मिळावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आमदार आदित्य ठाकरे यांनी स्वतः सेल्फी घेत निवेदन स्वीकारले. तसेच निवेदनातील मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आणि सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन दिल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना (उबाठा) विभागप्रमुख चंदन साळुंखे, गणपती पाटील, विश्वनाथ पाखरे, वैराळ सुळकर, सातेरी, पाटील, मारुती पाटील, गंगाराम वीर, अर्जुन वीर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
