‘बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’च्या घोषणेने वेधले लक्ष
पुणे : प्रतिनिधी
पुणे येथे एस. एम. जोशी पुलाशेजारी विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावहून पुण्यात जाऊन प्रत्यक्ष भेट देत पाठिंबा दिला.
या वेळी कोल्हापूरचे MPSC विद्यार्थी विवेकानंद पाटील यांनी महाराष्ट्र अखंड ठेवण्याचे आवाहन करत “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” असा सीमालढ्याचा जयघोष केला. त्यांच्या या घोषणेने आंदोलनस्थळी उपस्थित सीमावासीय आणि कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी विवेकानंद पाटील यांनी सीमालढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाचा उल्लेख करत, “या चळवळीसाठी १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. पुन्हा या लढ्यासाठी रक्त सांडण्याची वेळ आली, तर १०८ वा हुतात्मा मी असेन,” अशी भावनिक भूमिका व्यक्त केली.
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देतानाच महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी तसेच बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील तरुणाईने एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर, अशोक घगवे, सूरज जाधव, निलेश काकतकर, सचिन दळवी, श्रीकांत बुवा तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाचे गणपती पाटील, विश्वनाथ पाखरे, वैराळ सुळकर, गंगाराम वीर, सातेरी पाटील, भुजंग पाखरे, मारुती पाटील, हनुमंत पाटील, संदीप बावकर, अर्जुन वीर, संतोष कुंभार, परशुराम पाटील, कार्तिक पाटील, भडकू बुत्ते वाडकर, विनायक आदी उपस्थित होते.
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सीमाभागातून मिळालेला पाठिंबा आणि पुण्यात घुमलेला सीमालढ्याचा जयघोष हा महाराष्ट्राच्या एकात्मतेच्या लढ्याला नवी ऊर्जा देणारा ठरला.
