बेळगाव : प्रतिनिधी
कुल्फी अंकातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘लिहितं व्हा’–२०२६ या लेखन स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी सोमी मारुती पाटील हिने उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेसाठी विविध लेखन प्रकारांमध्ये विषय देण्यात आले होते. स्पर्धेला ३२ जिल्ह्यांतील ८२ शाळांमधून १८२ विद्यार्थ्यांनी आपले लेखन पाठविले होते. या स्पर्धेत सोमीने बेळगावचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट लेखनातून विजेतेपद मिळविले.
स्पर्धेतील विजेत्यांमध्ये इयत्ता सातवीतील अद्वैत तनया वैभव जोशी (चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे, अलिबाग), दहावीतील नम्रता रविकांत सिद्ध (महात्मा गांधी विद्यालय, आष्टा), चौथीतील सोमी मारुती पाटील (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव), पाचवीतील निवा महेश सोवनी (दादासाहेब दांडेकर विद्यालय, भिवंडी), सहावीतील आराध्य चैतन्य दांडेकर (जिल्हा परिषद शाळा, गुडघे, रत्नागिरी), दहावीतील भूमी पवार (सेक्रेड हार्ट स्कूल, कल्याण), सातवीतील सोनाक्षी शिंदे (पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, कोल्हापूर) आणि सातवीतील रितू वृंदा गणेश हंजगे (वि. स. खांडेकर प्रशाला, कोल्हापूर) यांचा समावेश आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांसाठी आगामी शैक्षणिक वर्षात पुणे येथे ‘अनुभवशाळा’ आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना जगभरातील बालसाहित्य, चित्रकला आणि विविध कलाकृतींचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. तसेच माधुरी पुरंदरे आणि वसीम मणेर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार असून, त्यातून त्यांच्या लेखनाला अधिक चांगली दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
सोमीला प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, स्पर्धा विभाग प्रमुख मुक्ता आलगोंडी, शाहीन शेख तसेच पालकांचे मार्गदर्शन लाभले.
सोमीच्या या यशाबद्दल मराठी विद्यानिकेतन शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
