सीमालढ्याला सदैव ताकद देण्याचा निर्धार; महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर सविस्तर चर्चा
बेळगाव : प्रतिनिधी
भालकी-बिदर दौरा आटोपून बेळगावकडे परतत असताना महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी सोलापूर येथे कट्टर शिवसैनिक आणि खासदार संजय राऊत यांचे विश्वासू सहकारी अतुल भवर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अतुल भवर यांनी त्यांचे आपुलकीने स्वागत करून सन्मान केला. या भेटीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, सीमावासीयांचे विविध प्रश्न आणि सीमालढ्याला भविष्यात अधिक बळ देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास शिवसेना आणि सीमाभागातील मराठी जनतेच्या संघर्षाशी जोडलेला आहे. प्रबोधनकार ठाकरे, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत ठाकरे कुटुंबाने सीमावासीयांच्या प्रश्नाला सातत्याने पाठिंबा दिला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शिवसेनेनेही योगदान दिले असून, सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी शिवसैनिक आजही ठाम भूमिका घेत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
बेळगावातील मराठी जनतेवर अन्याय झाल्यास कोल्हापूरकर ज्या तत्परतेने सीमाबांधवांच्या मदतीला धावून येतात, त्याच भावनेने सोलापूरही सीमालढ्याशी जोडलेले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाशी सोलापूरची नाळ कायमच घट्ट राहिली असून, सीमाभागातील मराठी जनतेच्या न्याय्य हक्कांच्या लढ्याला महाराष्ट्रातील विविध भागांतून पाठिंबा मिळत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
अतुल भवर यांनी यापूर्वीही समाजमाध्यमांच्या माध्यमातून सीमावासीयांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. २०२१ मधील बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यानही त्यांनी सीमावासीयांच्या बाजूने भूमिका घेत समाजमाध्यमांवरून प्रचार केला होता. भविष्यातही सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समिती सीमालढ्यासाठी एकजुटीने कार्यरत राहण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सीमाप्रश्न हा केवळ सीमाभागापुरता मर्यादित नसून, तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी जनतेच्या हक्कांचा प्रश्न आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाने सीमाबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहनही करण्यात आले.
सीमालढा सुरू आहे आणि सुरूच राहील; या न्याय्य लढ्याला महाराष्ट्राची ताकद सदैव मिळत राहील, असा निर्धार या भेटीतून व्यक्त करण्यात आला.
यावेळी सरचिटणीस मनोहर हुंदरे, अशोक घगवे, सचिन दळवी, रंजित हावळण्णाचे, रमेश माळवी, शिवसेना युवासेनेचे प्रमुख विनायक हुलजी, श्रीकांत नांदुरकर, वकील वैभव कुट्रे, हरीबसू धुळजी, विनायक पवार, राजू पाटील, निलेश काकतकर, सूरज जाधव, उमेश पाटील, परिणय कदम, विद्येश बडस्कर, ओंकार बैलुरकर, ज्ञानेश चिकुर्डे, गोविंद कुडेंकर, यल्लाप्पा पाटील, चेतन खोटे, अमोल चौगुले, विनायक कांगले, यश कदम आणि प्रणव घगवे आदी उपस्थित होते.
