मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत महापालिका ठरावाचा निषेध; ग्रामीण निवडणुकांसाठी एकजुटीचे आवाहन

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत महापालिका ठरावाचा निषेध; ग्रामीण निवडणुकांसाठी एकजुटीचे आवाहन

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव महानगरपालिकेत महाजन अहवालाच्या बाजूने झालेल्या ठरावाच्या पार्श्वभूमीवर त्याचा निषेध करण्यासह आगामी १ नोव्हेंबर आणि ग्रामीण भागातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मध्यवर्ती अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीच्या प्रारंभी समितीच्या कार्यासाठी योगदान देत काळाच्या पडद्याआड गेलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर प्रकाश मरगाळे यांनी प्रास्ताविक करत बैठकीतील विविध विषय मांडले.

यावेळी आर. एम. चौगुले यांनी महापालिका निवडणुकीतील परिस्थितीचा संदर्भ देत समितीचे नगरसेवक कमी निवडून आल्याने महापालिकेत मराठी प्रश्नांशी संबंधित ठरावाला विरोध करण्याची अपेक्षित ताकद कमी पडल्याचे मत व्यक्त केले. मराठी मतांवर निवडून आलेल्या सत्ताधारी व विरोधी गटातील काही मराठी नगरसेवकांनी महापालिकेतील ठरावाला पाठिंबा दिल्याचा आरोप करत आगामी ग्रामपंचायत, तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांमध्ये अधिक सतर्क राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समितीशी संबंधित सर्व घटकांनी एकत्रितपणे निवडणूक लढवून उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

रणजीत चव्हाण-पाटील यांनी यापूर्वी महापालिकेत कार्यरत असलेल्या मराठी नगरसेवकांनी सीमाप्रश्नाशी एकनिष्ठ राहत घेतलेल्या भूमिकांची आठवण करून दिली. महापालिकेत झालेल्या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांच्या भूमिकेचा निषेध करण्याची सूचना त्यांनी मांडली.

नेताजी जाधव यांनी महापालिका आयुक्तांच्या भूमिकेवरही आक्षेप घेतला. घटनात्मक पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी ठरावाच्या प्रक्रियेत भूमिका घेतल्याने भाषिक प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आणि आयुक्तांच्या भूमिकेचा निषेध करण्याची सूचना मांडली.

माजी आमदार मनोहर किणेकर यांनी आगामी ग्रामीण भागातील निवडणुकांवर भाष्य करत समितीचा प्रभाव मजबूत करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज व्यक्त केली. तसेच वाटाळ नागराज यांच्या वक्तव्यावर त्यांनी टीका केली.

अध्यक्षीय भाषणात प्रकाश मरगाळे यांनी महापालिकेत महाजन अहवालाच्या बाजूने ठराव मांडणाऱ्या राष्ट्रीय पक्षांतील मराठी नगरसेवकांच्या भूमिकेचा निषेध केला. यावेळी सीमाप्रश्नासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुरू असलेल्या कामकाजाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. आगामी १ नोव्हेंबरच्या कार्यक्रमाबाबतही आवश्यक सूचना करण्यात आल्या.

बैठकीत मालोजी अष्टेकर, रामचंद्र मोदगेकर, एम. जी. पाटील, मनोहर संताजी, शिवाजी खांडेकर, गोपाळ देसाई यांच्यासह मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले.

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, सीमाप्रश्नाशी संबंधित भूमिका आणि १ नोव्हेंबरच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर समितीच्या पुढील रणनीतीबाबत बैठकीत चर्चा झाली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

twenty − 3 =

error: Content is protected !!