पुणे : प्रतिनिधी
पुण्यात विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विद्यार्थ्यांना सीमाभागातील कार्यकर्त्यांनी भेट देत आपला खंबीर पाठिंबा दर्शविला. या वेळी विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली.
सीमाभागातील नागरिक आणि कार्यकर्ते नेहमीच विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असा विश्वास यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना देण्यात आला. या भेटीदरम्यान बेळगावची खास ओळख असलेली भाकर-चटणी आणि प्रसिद्ध कुंदा आंदोलक विद्यार्थी विवेकानंद पाटील यांना भरवून सीमाभागातील आपुलकीची भावना व्यक्त करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आमदार रोहित पवार यांचाही यावेळी कांबळ (घोंगडी) देऊन विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक करत सीमाभागातील कार्यकर्त्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सीमाभागातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या या भेटीमुळे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना भावनिक आधार मिळाला. विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्यांची शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या वेळी रमाकांत कोंडुस्कर, अमित देसाई, राजेंद्र बैलूर, विनोद बिर्जे, दिनेश जगताप, अजय सावंत, मंदार पाबळ, रईस बागवान आणि प्रणय पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
