पुण्यात महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक; सीमाप्रश्नावर मोठ्या जनआंदोलनाचा निर्धार

पुण्यात महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक; सीमाप्रश्नावर मोठ्या जनआंदोलनाचा निर्धार

पुणे, दि. १ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाला पुन्हा वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती, पुणे विभागाची महत्त्वपूर्ण बैठक पुणे येथे पार पडली. बैठकीत बिदर-भालकीसह बेळगाव, खानापूर, कारवार, निपाणी आणि संपूर्ण सीमाभागातील सद्यस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समिती बिदर-भालकीचे अध्यक्ष दिनेश मुधाळे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी बिदर व भालकी तालुक्यातील मराठी भाषिकांवरील अन्याय, मराठी शाळा बंद करण्याचे प्रयत्न तसेच कर्नाटक सरकारकडून मिळणाऱ्या वागणुकीबाबत माहिती दिली.

सीमाभागातील बदलती लोकसंख्या, मराठी पाट्यांना होणारा विरोध आणि तरुणांवर दाखल होणाऱ्या गुन्ह्यांबाबतही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाच्या सुनावणीबाबत महाराष्ट्रातील नेते आणि समन्वयक मंत्र्यांकडून झालेल्या पाठपुराव्याचाही आढावा घेण्यात आला.

पुणे-मुंबईत मोठे जनआंदोलन उभारणार

बैठकीत आगामी काही महिन्यांत केवळ बेळगावपुरते मर्यादित न राहता बिदर-भालकी, कारवारसह संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिकांना एकत्र करून पुणे आणि मुंबई येथे मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार करण्यात आला.

या आंदोलनाच्या माध्यमातून ७० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीमा प्रश्नाकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीला पुणे विभागातील विश्वनाथ पाखरे, गणपती पाटील, सातेरी पाटील, वैराळ सुळकर, मारुती पाटील, गंगाराम वीर, अर्जुन वीर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी दिनेश मुधाळे यांनी, “आता फक्त निवेदन देऊन प्रश्न सुटणार नाही, रस्त्यावर उतरून दिल्लीचे लक्ष वेधावेच लागेल,” अशी ठाम भूमिका मांडली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eleven + 15 =

error: Content is protected !!