तिलारी-म्हादाई पाणीप्रश्नासह सीमाभागातील विविध मुद्द्यांवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक

तिलारी-म्हादाई पाणीप्रश्नासह सीमाभागातील विविध मुद्द्यांवर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक

बेळगाव : प्रतिनिधी — मराठा मंदिर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न, तिलारी व म्हादाई पाणीप्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्न, शिक्षक भरती तसेच मराठी शाळांच्या संरक्षणासह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीच्या सुरुवातीला रणजीत चव्हाण यांनी स्वागत केले. त्यानंतर अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी प्रास्ताविक करताना सीमाभागातील प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. चार महिन्यांपूर्वी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते; मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही ठोस हालचाल झालेली नाही, अशी नाराजी बैठकीत व्यक्त करण्यात आली.

तिलारीचे पाणी बेळगावकडे वळविण्याच्या प्रयत्नांबाबत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका काय असावी, यावर चर्चा झाली. तसेच म्हादाईचे पाणी धारवाडकडे वळविले जात असल्याच्या मुद्द्यावरही विचारविनिमय करण्यात आला. या पाण्याचा लाभ कन्नड भागाला होणार असताना त्याची पर्यावरणीय व इतर भरपाई सीमाभागातील मराठी गावांना करावी लागू नये, अशी भूमिका मांडण्यात आली.

सर्वोच्च न्यायालयातील सीमाप्रश्नाची सद्यस्थिती आणि पुढील कायदेशीर कार्यवाहीवरही चर्चा झाली. भाषिक अल्पसंख्याकांच्या संदर्भातील न्यायालयीन निर्णयाबाबत कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करण्याच्या प्रक्रियेत वकिलांकडून होत असलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

जिल्हाधिकारी यांच्याकडे मराठी याद्या सर्वत्र उपलब्ध करून देण्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती समितीचे शिष्टमंडळ भेटणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. तसेच शिक्षक भरतीच्या प्रश्नावरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

21 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिलेल्या पत्राचा संदर्भ बैठकीत घेण्यात आला. कर्नाटक विधानसभेत बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर यांनी मराठी शाळा बंद करण्यासंदर्भात मांडलेल्या भूमिकेचा निषेध करत सीमाभागातील मराठी शाळांचे संरक्षण करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. या विषयावरही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली.

यावेळी रणजीत चव्हाण पाटील यांनी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांच्यासोबत होणाऱ्या भेटीच्या नियोजनासंदर्भात माहिती दिली.

नेताजी जाधव यांनी तिलारी पाणीप्रश्नासंदर्भात माजी नगरसेवक संघटनेच्या झालेल्या बैठकीची माहिती मध्यवर्ती समितीसमोर मांडली. तिलारीचे पाणी वळविण्याच्या विषयाबाबत अनेकजण अद्याप अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात रणजीत चव्हाण आणि मालोजी अष्टेकर यांनीही बैठकीतील माहिती दिली. मालोजी अष्टेकर यांनी माजी नगरसेवक संघटनेतील मराठी नगरसेवकांची भूमिका स्पष्ट केली.

बैठकीत माजी आमदार मनोहर किनेकर, आबासाहेब दळवी, मनोहर हुंदरे, रामचंद्र मोदगेकर, अनिल पाटील आदींनी विविध विषयांवर आपले विचार मांडले. बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − nine =

error: Content is protected !!