राणी चन्नम्मा चषकावर मराठा मंडळ ताराराणीच्या महिला कबड्डी संघाची मोहोर!

राणी चन्नम्मा चषकावर मराठा मंडळ ताराराणीच्या महिला कबड्डी संघाची मोहोर!

बैलहोंगळच्या संघाला अंतिम सामन्यात सहा गुणांनी नमवत पटकावला प्रथम क्रमांक; आठ हजार रुपयांचे पारितोषिक

खानापूर : बेधडक बेळगाव वृत्तसेवा

कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने आयोजित राणी चन्नम्मा चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मराठा मंडळ ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूरच्या महिला कबड्डी संघाने शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात बैलहोंगळच्या संघाचा सहा गुणांनी पराभव करून ताराराणीच्या महिला खेळाडूंनी मानाच्या राणी चन्नम्मा भव्य चषकावर आपले नाव कोरले. या विजयाबद्दल संघाला भव्य चषकासह आठ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

कित्तूरच्या ऐतिहासिक भूमीत झालेल्या या स्पर्धेत ताराराणीच्या महिला खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक आणि नियोजनबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. उत्कृष्ट पकड आणि प्रभावी चढायांच्या जोरावर त्यांनी रामदुर्ग, कडोली, कोप्पळ, बिडदी, हुबळी, गोकुळ आणि बैलहोंगळ यांसारख्या संघांना मात देत स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले.

स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गदग संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ताराराणीच्या खेळाडूंनी १८ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतरही त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. अंतिम सामन्यात बैलहोंगळच्या संघाविरुद्ध सहा गुणांची आघाडी मिळवत त्यांनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या या खेळाडूंनी आपल्या कौशल्याच्या, जिद्दीच्या आणि सांघिक प्रयत्नांच्या जोरावर अनुभवी व बलाढ्य संघांना कडवी झुंज दिली. या विजयामुळे खानापूर तालुक्यासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विजयी खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू (हलगेकर) यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळाली. महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील, क्रीडाशिक्षक प्रशांत पाखरे, भीमसेन आणि भरमाजी पाटील यांच्यासह प्राध्यापक वर्गाने विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.

तसेच संस्थेचे संचालक शिवाजीराव पाटील आणि परशराम गुरव यांनीही महिला खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन केले.

ताराराणीच्या महिला संघाने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील मुलींच्या क्रीडाक्षेत्रातील क्षमतेची आणि त्यांच्या मेहनतीची साक्ष देणारे ठरले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × one =

error: Content is protected !!