बेळगाव : प्रतिनिधी
कर्नाटक सरकारच्या प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी व उर्दू माध्यमांना डावलण्यात आल्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेल्या पाठपुराव्याची जिल्हा शिक्षण विभागाने दखल घेतली आहे. मराठी व उर्दू माध्यमांच्या शिक्षक भरतीसंदर्भातील समितीची निवेदने पुढील कार्यवाहीसाठी कर्नाटक सरकारच्या शिक्षण विभागाच्या मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आली आहेत.
कर्नाटक सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या सुमारे १५ हजार रिक्त जागांच्या भरतीसाठी १२ ऑगस्ट २०२६ रोजी अधिसूचना जारी केली होती. बेळगाव जिल्ह्यातील भरती प्रक्रियेत मराठी व उर्दू माध्यमातील उमेदवारांना पुरेसे प्रतिनिधित्व नसल्याने मराठी भाषिक उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने १३, १४ आणि १८ ऑगस्ट रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे निवेदने सादर केली होती. मराठी व उर्दू माध्यमातील पात्र उमेदवारांनाही शिक्षक भरतीमध्ये योग्य संधी द्यावी, आवश्यक सुधारणा करून सुधारित अधिसूचना जारी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती. मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला होता.
जिल्हा शिक्षण विभागाकडून राज्याकडे निवेदने
१८ ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या पत्रात समितीने केलेल्या पाठपुराव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. १२ ऑगस्टच्या शिक्षक भरती अधिसूचनेसंदर्भात प्राप्त झालेली निवेदने तसेच १३, १४ आणि १८ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पाठपुराव्याची नोंद घेऊन संबंधित निवेदने पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी शिक्षण विभाग, कर्नाटक सरकार, बेंगळूर यांच्याकडे पाठविण्यात आल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
बेंगळूरमध्येही डीएड, बीएड विद्यार्थ्यांचा पाठपुरावा
दरम्यान, बेंगळूर येथे अधिवेशनाच्या काळात डीएड आणि बीएड विद्यार्थ्यांनी संबंधित मंत्री तसेच लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन मराठी व उर्दू माध्यमांच्या शिक्षक भरतीचा मुद्दा मांडला होता. या पाठपुराव्यानंतर मराठी माध्यमासाठी २०० आणि उर्दू माध्यमासाठी ८०० जागांचा प्रस्ताव मान्य झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, मराठी माध्यमासाठी ८०० ते ९०० शिक्षकांची भरती करण्यात यावी, अशी मागणी पात्र उमेदवारांकडून करण्यात येत आहे. सध्या मान्य झालेल्या २०० जागांमध्ये वाढ करण्यासाठीही पाठपुरावा सुरू आहे.
सुधारित अधिसूचनेकडे लक्ष
जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने समितीच्या निवेदनांची दखल घेत ती राज्याच्या शिक्षण विभागाकडे पाठविल्याने मराठी भाषिक तसेच शिक्षक भरतीसाठी पात्र असलेल्या डीएड, बीएड उमेदवारांच्या आशा वाढल्या आहेत.
आता मराठी माध्यमाच्या वाढीव जागांना मंजुरी देऊन सुधारित शिक्षक भरती अधिसूचना कधी जारी केली जाणार, याकडे सीमाभागातील मराठी भाषिक आणि हजारो पात्र उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
“मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय होईपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे. शासनाने केवळ प्रस्ताव न ठेवता प्रत्यक्ष मराठी माध्यमाच्या जागा वाढवून सुधारित अधिसूचना काढावी,” अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने व्यक्त केली आहे.
