बेळगाव : प्रतिनिधी
मराठमोळ्या पारंपरिक संस्कृतीतील महत्त्वाचा सण असलेल्या मंगळागौरीचा उत्साह आणि जल्लोष मंगळवारी बेळगावातील गणेश फेस्टिवलच्या व्यासपीठावर अनुभवायला मिळाला. नक्षत्र ग्रुप बेळगावच्या महिलांनी पारंपरिक मंगळागौरीची गीते, विविध खेळ, नृत्य आणि पारंपरिक सादरीकरणातून समृद्ध लोकपरंपरा व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविले.
गणेश फेस्टिवलच्या तिसऱ्या दिवशी नक्षत्र ग्रुप बेळगावच्या वतीने मंगळागौरीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कै. स्मिता पाठक यांनी सुरू केलेल्या मंगळागौरीच्या संकल्पनेचा वारसा प्राजक्ता बेडेकर पुढे नेत आहेत. यंदाच्या कार्यक्रमातही महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत पारंपरिक संस्कृतीचा जागर केला.
पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिलांनी गणेशस्तवन तसेच देवीचा जागर सादर केला. नऊवारी साडी, नथ आणि पारंपरिक दागिन्यांनी नटलेल्या महिलांनी विविध पारंपरिक खेळ आणि फुगड्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली.
यावेळी वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, आगोटा-पागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासू-सून भांडण, अडवळ घुम-पडवळ घुम, दिंड आणि घोडा अशा पारंपरिक खेळांचे सादरीकरण करण्यात आले.
मंगळागौर हा केवळ धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम नसून महिलांसाठी आनंद, मनोरंजन, शारीरिक हालचाल आणि एकत्र येण्याचे प्रभावी माध्यम आहे. बदलत्या काळातही या लोकपरंपरा जपण्याचे आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व या कार्यक्रमातून अधोरेखित झाले. श्रद्धा, परंपरा आणि आनंद यांचा सुंदर संगम या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.
दरम्यान, यंदाच्या श्री गणेश फेस्टिवलची सांगता उद्या बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. गुड्स रोड येथील श्रीमाता सभागृहात सायंकाळी ठीक ४ वाजता नवरत्न सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
नवरत्न सन्मान सोहळ्याने यंदाच्या गणेश फेस्टिवलची सांगता होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या समारोप सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
