बेळगाव : दुसऱ्या महायुद्धात इटलीमध्ये शौर्यपूर्ण लढा देत अवघ्या २२व्या वर्षी सर्वोच्च बलिदान देणारे आणि मरणोत्तर व्हिक्टोरिया क्रॉस सन्मानाने गौरविले गेलेले नाईक यशवंत घाडगे, व्हीसी यांच्या शौर्यगाथेतून भारत आणि इटलीतील विद्यार्थ्यांमध्ये संवादाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
आर्मी पब्लिक स्कूल, द मराठा एलआयआरसी, बेळगाव आणि इटलीतील ज्युसेप्पे पोलिडोरी सेकंडरी स्कूल, मॉन्टोन या दोन शाळांमधील विद्यार्थ्यांनी या संवादात सहभाग घेतला. इटलीतील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या संवादाच्या माध्यमातून दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना इतिहासातील एका समान अध्यायाशी जोडण्याची तसेच नाईक यशवंत घाडगे यांच्या शौर्याची आणि बलिदानाची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. इटलीतील मॉन्टोन येथे नाईक घाडगे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेले स्मारक त्यांच्या शौर्याची आणि भारत-इटली मैत्रीची कायमस्वरूपी आठवण करून देते.
यावेळी आर्मी पब्लिक स्कूल, बेळगावच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची तसेच रेजिमेंटशी असलेली नाळ विद्यार्थ्यांसमोर मांडली. नाईक घाडगे यांच्या शौर्याची गाथा सादर करण्याबरोबरच नॅरेटेड माइमच्या माध्यमातून त्यांच्या बलिदानाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. तसेच रेजिमेंटल म्युझियमची झलकही विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली.
यानंतर भारत आणि इटलीतील विद्यार्थ्यांमध्ये उत्स्फूर्त संवाद झाला. या संवादातून दोन्ही देशांच्या संस्कृती आणि इतिहासाबद्दल परस्पर समज वाढण्यास तसेच मैत्रीचे संबंध दृढ करण्यास मदत झाली.
कार्यक्रमाची सांगता भारत आणि इटलीच्या राष्ट्रगीतांनी करण्यात आली. त्यानंतर आभार प्रदर्शन झाले. एका तरुण भारतीय सैनिकाच्या शौर्याची आठवण आजही दोन देशांतील तरुणांना प्रेरणा देत असून, त्याच्या बलिदानातून भारत-इटली मैत्रीचे बंध अधिक दृढ होत असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
