नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची सदिच्छा भेट

नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांची सदिच्छा भेट

बेळगावला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजनांची मागणी

बेळगाव : प्रतिनिधी

नुकतेच बेळगाव शहराच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारलेले प्रकाश निकम यांची बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी विविध भागांतील लोकप्रतिनिधी, माजी उपमहापौर, माजी नगरसेवक-नगरसेविका, सामाजिक संस्थांचे प्रमुख आणि मान्यवरांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नूतन पोलीस आयुक्तांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

या भेटीदरम्यान शहरातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था तसेच वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येसह विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः युवक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढत असलेल्या अमली पदार्थांच्या वापराबाबत उपस्थितांनी गंभीर चिंता व्यक्त केली.

युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात

शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे युवक-युवती तसेच तरुण पिढी अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढली जात असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. अमली पदार्थांच्या व्यसनामुळे संबंधित युवकाचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याबरोबरच त्याचा गंभीर परिणाम संपूर्ण कुटुंबावर आणि पुढे समाजव्यवस्थेवरही होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात तसेच शहरातील संवेदनशील ठिकाणी अमली पदार्थांची विक्री व वापर रोखण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त, नियमित तपासणी, गस्त आणि प्रभावी नियंत्रण यंत्रणा राबवावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच पोलीस प्रशासनासोबत शैक्षणिक संस्था, पालक, सामाजिक संस्था आणि नागरिकांचा सहभाग असलेली प्रभावी समन्वय यंत्रणा उभारण्याची मागणीही करण्यात आली.

बोरसे यांच्या काळातील कारवाईचा संदर्भ

यावेळी माजी पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झालेल्या अशाच एका भेटीचा संदर्भ देण्यात आला. त्यावेळीही बेळगाव शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येबाबत चर्चा करून शहराला व्यसनमुक्त करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती.

त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून अमली पदार्थांविरोधात विविध उपक्रम व कारवाया राबविण्यात आल्या. त्याच धर्तीवर नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनीही अमली पदार्थांविरोधात कठोर भूमिका घेऊन बेळगाव शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण मोहीम राबवावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

शाळा-महाविद्यालयांवर विशेष लक्ष देण्याची मागणी

विद्यार्थ्यांना अमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी केवळ पोलिसांची कारवाई पुरेशी नसून पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच संवेदनशील भागांमध्ये विशेष पथके तैनात करून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी करण्यात आली.

मोबाईलच्या अतिवापराबाबतही मार्गदर्शन

विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईलच्या अतिवापराबाबतही यावेळी चर्चा झाली. लहान मुले, शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन युवक मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या वापराकडे आकर्षित होत असून त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर, शारीरिक हालचालींवर आणि सामाजिक जीवनावर होत असल्याचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी अनावश्यक मोबाईल वापर कमी करावा तसेच त्यांना क्रीडा, मैदानी उपक्रम, अभ्यास आणि सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे, असे मार्गदर्शन त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक संस्थांनीही पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून सुरक्षित बेळगाव

अमली पदार्थांचा वाढता धोका, युवकांचे भवितव्य, शाळा-महाविद्यालयांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसह विविध विषयांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

पोलीस प्रशासन, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांमध्ये सातत्यपूर्ण समन्वय राहिल्यास बेळगाव अधिक सुरक्षित आणि व्यसनमुक्त करण्यासाठी प्रभावीपणे काम करता येईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

नूतन पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी उपस्थितांच्या सूचना व मागण्या सकारात्मकपणे ऐकून घेतल्या. शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या प्रसंगी रमाकांत कोंडुस्कर, विकास कलघटगी, रमेश पावले, रणजित चव्हाण पाटील, माजी उपमहापौर संजय शिंदे, रेणू मुतकेकर, माजी नगरसेवक/नगरसेविका राजू बिरजे, सुद्दा भातखंडे, शिवाजी कुडुसकर, मनोहर हलगेकर, वैशाली हुलजी, विजय भोसले, विनायक, प्राचार्य आनंद आपटेकर, सागर पाटील, संजय पाटील, मोतेस बारदेशकर, कपिल भोसले, प्रशांत भातकांडे, महेश मुतकेकर यांच्यासह विविध भागांतील प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.

सदिच्छा भेटीनंतर उपस्थितांनी नूतन पोलीस आयुक्तांना शुभेच्छा देत, “बेळगाव शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी प्रशासनाने कठोर व प्रभावी पावले उचलावीत. या मोहिमेत नागरिक आणि विविध सामाजिक संस्था पोलीस प्रशासनाच्या पाठीशी राहतील,” असा विश्वास व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

18 + three =

error: Content is protected !!