वडगाव, प्रतिनिधी : आदर्श नगर, वडगाव येथील संजीविनी फौंडेशनमध्ये यंदाही पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मातीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून रंग व थर्माकोलचा वापर टाळण्यात आला. फौंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी कार्डशीट आणि पुठ्ठ्याचा वापर करून आकर्षक सजावट केली.
पाच दिवसांच्या गणेशोत्सवात दररोज सकाळ-सायंकाळ गणरायाची आरती भक्तिभावाने करण्यात आली. आसावरी भोकरे व डॉ. भोकरे, डॉ. एम. एल. तुक्कार व डॉ. उज्ज्वला तुक्कार, डॉ. अनिल पोटे व सुरेखा पोटे, ॲड. अमर येळ्ळूरकर व कुटुंबीय, क्रेडाईचे अध्यक्ष युवराज हुलजी, आरसीयूचे डॉ. अशोक डिसोझा तसेच मीना हरी नायडू यांच्या हस्ते विविध दिवशी आरती संपन्न झाली.
उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली. चौथ्या दिवशी गौरी आगमनानिमित्त पारंपरिक झिम्मा-फुगडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामुळे महिलांसह उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
पाचव्या दिवशी आदर्श नगर परिसरातून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर फौंडेशनच्या आवारात विशेष तयार करण्यात आलेल्या विसर्जन कुंडात गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. मूर्ती विरघळल्यानंतर मिळणारी माती झाडांना घालण्यात येणार असून, या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
संजीविनी फौंडेशनमध्ये दरवर्षी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. नागरिकांनी पीओपीच्या मूर्ती टाळून मातीच्या किंवा शाडूच्या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करावी, असे आवाहन संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी केले.
भक्ती, परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम साधत संजीविनी फौंडेशनच्या पाच दिवसीय गणेशोत्सवाची उत्साहपूर्ण सांगता झाली.
