कुद्रेमानी : कुद्रेमानी गावच्या ग्रामदैवत श्री मरगाई देवीच्या गोंधळ यात्रेचे औचित्य साधत लोहार कुटुंबीयांनी भक्तिभावाने श्री महालक्ष्मी देवीच्या चरणी सव्वा तोळ्याचे सोन्याचे गंठण अर्पण केले. या धार्मिक सोहळ्यामुळे यात्रेच्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात अधिक भर पडली.
स्वर्गीय अर्जुन सतबा लोहार यांचे सुपुत्र भरमाणा अर्जुन लोहार, संजय अर्जुन लोहार आणि राजेंद्र अर्जुन लोहार यांनी आपल्या कुटुंबाच्या वतीने हा मौल्यवान अलंकार देवीला अर्पण केला. यावेळी देवीचे मानकरी व पूजारी लक्ष्मी अर्जुन सुतार आणि मनिषा जोतिनाथ सुतार यांच्याकडे विधिवत दागिना सुपूर्द करण्यात आला.
यावेळी लोहार बंधूंनी सांगितले की, मरगाई देवीच्या गोंधळ यात्रेच्या पावन निमित्ताने ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या चरणी हा अलंकार अर्पण करण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद असून, देवीची कृपादृष्टी सर्व ग्रामस्थांवर कायम राहावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.
या प्रसंगी दिपक पाटील, नाना मारुती पाटील, रवी पाटील, मारुती व्यंकट सुतार, शिनोळी येथील दत्तात्रय रामू सुतार यांच्यासह ग्रामस्थ व लोहार कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोंधळाच्या पवित्र वातावरणात पार पडलेल्या या अर्पण सोहळ्याचे ग्रामस्थांनी स्वागत करत लोहार कुटुंबाच्या दातृत्वाचे कौतुक केले. देवीच्या दागिन्यांमध्ये मौल्यवान भर पडल्याने मंदिराच्या वैभवात वाढ झाली असून, श्री महालक्ष्मीची कृपादृष्टी समस्त ग्रामस्थांवर सदैव राहो, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
