आषाढी एकादशीनिमित्त सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथे भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात

आषाढी एकादशीनिमित्त सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथे भक्तिमय दिंडी सोहळा उत्साहात

बेळगाव : आषाढी एकादशीचे औचित्य साधत सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथे भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वारकरी परंपरेचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एसडीएमसी सदस्य अमोल लाड यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी टाळ, अभंग आणि भक्तिगीतांच्या साथीने गावातून दिंडी काढली. या दिंडीत बजरंग धामणेकर यांनी मुख्य मृदुंगाची साथ देत संपूर्ण वातावरण भक्तिमय केले.

दिंडीतील विद्यार्थ्यांच्या हातातील समाजप्रबोधनपर फलक हे विशेष आकर्षण ठरले. “ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी लिहिली गाथा – समृद्ध झाली मराठी भाषा”, “व्यसनमुक्त समाज घडवूया” आणि “वारीतील स्वच्छता राखूया” अशा संदेशांद्वारे विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव आणि जनजागृतीचा प्रभावी संदेश दिला.

दिंडी गावातून मार्गक्रमण करत असताना मच्छे येथील भाविकांनी विविध ठिकाणी आरती व पूजन करून दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यामुळे संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने आणि भक्तिरसाने भारावून गेला.

या सांस्कृतिक उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत साहित्य, मराठी भाषेचे महत्त्व आणि सामाजिक बांधिलकी यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षकवृंद, एसडीएमसी सदस्य, पालक तसेच विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 − three =

error: Content is protected !!