बेळगाव : पार्वती नगर, कंग्राळी बी.के. आणि कंग्राळी के.एच. परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांकडून वारंवार हल्ले होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांत चार लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्यांना जखमी केले आहे. या घटनांमुळे मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी किंवा शाळेत जाण्यासाठीही भीती वाटत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, सोशल वर्कर टीमने भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाबाबत बेळगाव महानगरपालिकेकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात भटक्या कुत्र्यांचे नियंत्रण, संवेदनशील भागातून त्यांचे स्थलांतर तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला तातडीने लक्ष घालून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे.
