बेळगाव : येळ्ळूर परिसरातील रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी अशोका बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाब विचारत तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम, पावसामुळे रस्त्यावर साचणारा चिखल आणि माती यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
पावसाळ्यात वाहनांच्या चाकांसोबत रस्त्यावर येणाऱ्या मातीमुळे रस्ता अत्यंत निसरडा बनत असून दुचाकी व चारचाकी वाहनांचे वारंवार अपघात होत आहेत. अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू असतानाही हा प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मागील रविवारी निसरड्या रस्त्यामुळे झालेल्या अपघातात तब्बल २१ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर कंपनीकडून तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याची स्वच्छता करून माती हटविण्यात आली. मात्र, तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी कंपनीला कडक शब्दांत इशारा देत सांगितले की, “रस्त्यावरील माती व अपघातांचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरून काम पूर्णपणे बंद पाडतील.”
ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना सुनावत, “रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी आमचीही इच्छा आहे. मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी ही परिस्थिती आता सहन केली जाणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आमच्या भावना पोहोचवा आणि तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करा,” अशी मागणी केली.
या घटनेमुळे येळ्ळूर परिसरातील रस्ते सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासन आणि संबंधित कंपनीने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
