सीमाप्रश्न सुटणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी आमदार दिगंबर पाटील

सीमाप्रश्न सुटणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी आमदार दिगंबर पाटील

१ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे शिवस्मारक येथे लाक्षणिक उपोषण; सीमालढ्यात युवकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन

खानापूर : गेल्या सत्तर वर्षांपासून सुरू असलेल्या सीमालढ्याला यशस्वी पूर्णविराम देण्याची वेळ जवळ आली असून, सीमाप्रश्न सुटणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा ठाम विश्वास महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी व्यक्त केला. सीमाप्रश्नाच्या लढ्यात महाराष्ट्र एकीकरण समितीने आपल्या मूळ तत्त्वांशी कधीही तडजोड केलेली नाही. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेला हा लढा प्रश्न सुटेपर्यंत सुरूच राहील. त्यामुळे युवा पिढीने या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

१ नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त रविवारी खानापूर येथील श्री राजा छत्रपती शिवस्मारक सभागृहासमोर महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या उपोषणाचे दुपारी ३ वाजता सभेत रूपांतर झाले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.

भाषावार प्रांतरचनेच्या वेळी मराठी भाषिक बहुल प्रदेश तत्कालीन म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला. तेव्हापासून सीमावासीय आपल्या न्याय्य मागणीसाठी संघर्ष करीत आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अधिकारी आणि प्रशासनावर दबाव टाकून भाषिक वाद चिघळविण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत मराठी भाषिकांनी एकजुटीने आणि समितीच्या मूळ तत्त्वांवर ठाम राहून लढा पुढे नेणे आवश्यक असल्याचे दिगंबर पाटील यांनी सांगितले.

सभेच्या अध्यक्षस्थानी गोपाळ देसाई होते. त्यांनी सीमालढ्याची पार्श्वभूमी, महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आणि सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर भाष्य केले. आगामी काळात युवकांची संघटना मजबूत करून तालुक्यात समितीचे संघटन आणि मराठी भाषिकांचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अनेक दशकांपासून मराठी भाषिक या मागणीसाठी एकत्रितपणे संघर्ष करीत आहेत. आता युवा पिढीही समितीकडे येत असून, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ देण्याची जबाबदारी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची आहे. युवकांच्या सहभागातून समितीचे संघटन अधिक मजबूत होईल. नव्या पिढीला सीमालढ्याचा इतिहास आणि त्यामागील भूमिका समजावून सांगणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी सीमाप्रश्नाचा लढा पुढे नेण्यासाठी संघटन मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. युवकांना एकत्र आणून त्यांच्यात सीमाप्रश्नाविषयी जागृती निर्माण करावी. राजकीय पक्षांचे विचार आणि मतभेद बाजूला ठेवून समितीचे ध्येय व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीला प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले.

विलास बेळगावकर यांनी समितीची स्थापना मूळ तत्त्वांच्या आधारावर झाली असून आजही त्याच तत्त्वांच्या बळावर लढा सुरू असल्याचे सांगितले. समितीच्या स्थापनेमागील उद्देश आणि भूमिका समजून घेऊन प्रत्येकाने प्रामाणिकपणे कार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी १ नोव्हेंबर काळा दिन पाळण्यामागील भूमिका स्पष्ट केली. सीमावासीयांच्या भावनांचा विचार करून केंद्र सरकारने सीमाप्रश्नाची गांभीर्याने दखल घेत तो लवकरात लवकर सोडवावा आणि मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रीय पक्ष आणि त्यांचे लोकप्रतिनिधी मराठी भाषा व संस्कृतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी युवा पिढीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, तसेच दिशाभूल करणाऱ्यांपासून दूर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी सीमाभागातील मराठी जनता आजही पारतंत्र्याचे जीवन जगत असल्याची भावना व्यक्त केली. मात्र, युवा पिढी सीमाप्रश्नाच्या लढ्यात सहभागी होत असल्याचे समाधान आहे. ज्येष्ठांनी तरुणांना पाठबळ देऊन त्यांचा उत्साह वाढवावा. तसेच सीमाभागातील परिस्थिती, मराठी भाषिकांचे प्रश्न आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत प्रसारमाध्यमांनी वस्तुस्थिती समाजासमोर मांडून जनजागृती करावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शुभम कांबळे, राजाराम देसाई, रामचंद्र गावकर, हणमंत जगताप, रविंद्र शिंदे, बाबुराव पाटील, आशिष कांबळे, गोपाळ हेब्बाळकर, भास्कर पाटील, कल्लाप्पा घाडी, जयराम देसाई, बाळासाहेब शेलार, जगन्नाथ बिर्जे आणि मारुती परमेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी शंकर गवाडा, प्रकाश चव्हाण, रणजीत पाटील, प्रल्हाद मादार, नारायण कापोलकर, अमृत शेलार, मारुती गुरव, यशवंत पाटील, संतोष पाटील, महत्रू ढबाले, वसंत नवलकर, संजीव पाटील, मुकुंद पाटील, ज्योतिबा जगताप, रमेश धबाले, रामचंद्र गावकर, मन्याप्पा पाटील, नागेश भोसले, सदानंद कांबळे, पुंडलिक पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

4 × five =

error: Content is protected !!