चन्नेवाडी, ता. खानापूर : प्रतिनिधी
खानापूर तालुक्यातील कसबा नंदगड ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येणाऱ्या चन्नेवाडी गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे गावातील दोन्ही बोरवेल आणि जुन्या विहिरीवरील पाणी उपसा करणाऱ्या मोटारी बंद पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जेमतेम ३०० लोकसंख्या असलेल्या चन्नेवाडी गावाला यापूर्वी दोन बोरवेल आणि जुन्या विहिरीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात होता. गावात पूर्वी मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता. इतकेच नव्हे, तर काही वेळा नंदगड येथील रहिवासीही चन्नेवाडीतून पाणी घेऊन जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कसबा नंदगड ग्रामपंचायतीच्या कथित दुर्लक्षामुळे दोन्ही बोरवेल आणि विहिरीवरील मोटारी बंद पडल्या आहेत. त्यामुळे गावावर पाणीटंचाईचे गंभीर संकट ओढवले आहे.
यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी आणि निवेदने सादर केली. मात्र, त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अखेर गावकऱ्यांनी बैठक घेऊन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी आमदार विठ्ठल हलगेकर यांना पाणीटंचाई दूर करण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले. तसेच निवेदनाच्या प्रती तहसीलदार, तालुका पंचायत आणि संबंधित कार्यालयांनाही देण्यात आल्या.
यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी ग्रामस्थांना येत्या आठ दिवसांत नवीन बोरवेल खोदून देण्याचे आश्वासन दिले. तसेच नवीन बोरवेलची व्यवस्था होईपर्यंत गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नागोजी पाटील, भरमाजी पाटील, सुधाकर पाटील, शंकर पाटील, स्वागत पाटील, दत्ताराम पाटील, श्रीनाथ पाटील, ईश्वर पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर आता आमदारांच्या आश्वासनानंतर तरी कायमस्वरूपी तोडगा निघणार का, याकडे चन्नेवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
