सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळ देण्यासाठी २० नोव्हेंबरला कोल्हापुरात भव्य धरणे आंदोलन; सीमाभागातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

सीमाप्रश्नाच्या लढ्याला बळ देण्यासाठी २० नोव्हेंबरला कोल्हापुरात भव्य धरणे आंदोलन; सीमाभागातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या न्याय्य मागणीसाठी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या वतीने शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी कोल्हापूर येथील दसरा चौकात भव्य लाक्षणिक धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. गेल्या ७० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाकडे महाराष्ट्र शासनाचे आणि संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनासाठी सीमाभागातून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता निपाणी येथील धर्मवीर संभाजीराजे चौकातून कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान करण्यात येणार आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी कोल्हापूरमधील विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांना आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.

यामध्ये महाराष्ट्राचे मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार हसन मुश्रीफ, श्रीमती सरोज पाटील (माई), समन्वयक मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार संपतराव पाटील, खासदार श्रीमंत शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, तसेच नियोजन समितीचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

याशिवाय बेळगावचे किरण ठाकूर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे माजी महापौर व सचिव मालोजी अष्टेकर, दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव, आरपीआयचे नेते शहाजी कांबळे व जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शिवसेनेचे विजय देवणे, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

सीमाभागातील मराठी भाषिकांच्या न्याय्य मागणीला कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी पाठिंबा द्यावा, या उद्देशाने या भेटीगाठी घेण्यात येत आहेत.

सीमाप्रश्नाचा लढा हा केवळ सीमाभागापुरता मर्यादित नसून मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांचा प्रश्न आहे. त्यामुळे या आंदोलनात सर्व मराठी भाषिकांनी एकजुटीने सहभागी होऊन सीमाप्रश्नाच्या मागणीला बळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

fifteen − 4 =

error: Content is protected !!