बेंगळुरूहून आलेल्या आईने प्रियकराच्या मदतीने मुलाची केली हत्या; झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळल्याचा पोलिसांचा खुलासा
बेळगाव : स्वतःच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी बेंगळुरू येथील आईसह सहा जणांना माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधातून आईनेच प्रियकराच्या मदतीने मुलाच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग असल्याचे समोर आले असून त्याच्यासह एकूण सात जणांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे बेळगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
३ नोव्हेंबर २०२६ रोजी बेळगाव शहरातील माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गालगत केएलई छत्रीजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. याबाबत माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४१/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान ४ नोव्हेंबर रोजी मृत व्यक्तीची ओळख विजय नारायण (वय २४) अशी पटली. त्याची आई मीना नारायण (वय ४४, रा. आर. टी. नगर, बेंगळुरू) हिने दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी राकेश याने विजयला आपल्या कारमधून बेंगळुरूहून बेळगावला आणले होते.
माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील संशयितांची माहिती मिळवली. त्यानंतर राकेश परशुराम जामुनी (वय ३४, रा. भीमनगर, तेरणी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), मीना नारायण (वय ४४, रा. बेंगळुरू), सचिन मल्लाप्पा कांबळे (वय ३४), मनोज धुंडाप्पा कांबळे (वय १९), तम्मण्णा रवींद्र कांबळे (वय २१) आणि एकनाथ उमाप्पा कांबळे (वय ३२) या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. मृत विजयची आई मीना हिचे आरोपी राकेश याच्यासोबत अनैतिक संबंध होते. या संबंधातून मुलगा विजय अडथळा ठरत असल्याने त्याला संपविण्याचा कट रचण्यात आला होता. त्यानुसार राकेशने अन्य आरोपींच्या मदतीने विजयला झोपेच्या गोळ्या मिसळलेले पेय दिले. त्यामुळे तो बेशुद्ध झाल्यानंतर कारमध्ये त्याच्या गळ्याला स्कार्फने जोरात आवळून त्याची हत्या करण्यात आली.
त्यानंतर मृतदेह राष्ट्रीय महामार्गालगत केएलई छत्रीजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात फेकून देण्यात आला. पोलिसांच्या तपासात आरोपींनी दिलेल्या माहितीतून हत्येचा संपूर्ण घटनाक्रम उघड झाला.
या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलालाही कायदेशीर प्रक्रियेत आणण्यात आले आहे. आणखी एका संशयिताचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, पीएसआय आनंद आदगोंड, एएसआय बी. एफ. बस्तवाड तसेच सीआय चिगरी, अरुण कांबळे, एम. जी. कुरेकर, के. बी. गौरणी, मल्लिकार्जुन गाडवी, गोपाळ लट्टी, महेश ओडयार, महेश मळगली, दीपक बिचगत्ती, द्यामप्पा मुरगोड आणि एम. एस. सागनूर यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
या पथकाचे पोलीस आयुक्त आणि बेळगाव शहराच्या डीसीपी यांनी कौतुक केले आहे.
