“वाचन केले तरच वाचाल” – विद्यार्थिनींना प्रा. मायाप्पा पाटील यांचा प्रेरणादायी संदेश

“वाचन केले तरच वाचाल” – विद्यार्थिनींना प्रा. मायाप्पा पाटील यांचा प्रेरणादायी संदेश

जायंट्स सखीच्या वतीने महिला विद्यालयात ‘वाचाल तर वाचाल’ विषयावर व्याख्यान

बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तक वाचन ही काळाची गरज असून, सातत्यपूर्ण वाचनामुळे जीवन अधिक समृद्ध आणि यशस्वी बनते, असे प्रतिपादन प्रा. मायाप्पा पाटील यांनी केले. जायंट्स सखीच्या वतीने महिला विद्यालय, बेळगाव येथे आयोजित “वाचाल तर वाचाल” या विषयावरील व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जायंट्स सखीच्या अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर होत्या. व्यासपीठावर विभागीय संचालक संजय पाटील, फेडरेशन संचालक सुनील मुतगेकर, अपर्णा पाटील तसेच महिला विद्यालयाचे मुख्याध्यापक कृष्णाजी पाटील उपस्थित होते.

प्रा. मायाप्पा पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियाचे वाढते आकर्षण पुस्तक वाचनापासून दूर नेत आहे. घरातील पुस्तके धूळ खात पडली असून विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकही मोबाईलच्या आहारी जात आहेत. त्यामुळे वाचन संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकाने चांगल्या पुस्तकांशी मैत्री करणे आवश्यक आहे.

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, सुधा मूर्ती आणि मार्क झुकेरबर्ग यांच्या जीवनातील उदाहरणे देत त्यांनी नियमित वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. “भविष्यात तुम्ही वाचन केलेत तरच वाचाल,” असा प्रेरणादायी संदेश देत त्यांनी विद्यार्थिनींना दररोज वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात अध्यक्षा सुलक्षणा शिनोळकर यांनी जायंट्स सखीतर्फे सातत्याने शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जात असल्याची माहिती दिली. मुख्याध्यापक कृष्णाजी पाटील यांनीही विद्यार्थिनींना वाचनाची आवड जोपासण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला शेकडो विद्यार्थिनी उपस्थित होत्या. तसेच जायंट्स सखीच्या माजी अध्यक्षा शीतल पाटील, उपाध्यक्षा राजश्री हसबे, स्वाती फडके, अर्चना कंग्राळकर, वैशाली भातकांडे, वरदा अंगडी, सुवर्णा काळे, सुलोचना कुट्रे, शीतल नेसरीकर, नीलिमा करंजीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दीपा पाटील यांनी केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

1 × 3 =

error: Content is protected !!