‘गंध मातीचा’ काव्यकार्यक्रम उद्या; साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन

‘गंध मातीचा’ काव्यकार्यक्रम उद्या; साहित्यप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन

बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या प्रेरणेने शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने कवयित्री सौ. स्मिता दीपक किल्लेकर यांच्या कवितांवर आधारित ‘गंध मातीचा’ या विशेष काव्यकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता मराठी विद्यानिकेतन, ज्योती महाविद्यालय कॅम्पस, बेळगाव येथे होणार असून त्यानंतर उपस्थित कवींसाठी खुले काव्यसंमेलनही आयोजित करण्यात आले आहे.

सौ. स्मिता किल्लेकर या गेली अनेक वर्षे मराठी साहित्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून कविता, कथा, ललित लेख, प्रवासवर्णन अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांचे लेखन प्रकाशित झाले आहे. सकाळ, तरुण भारत, पुढारी यांसह अनेक दैनिके तसेच विविध दिवाळी अंकांत त्यांच्या साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या आहेत. बेळगावच्या साहित्य-सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असून शब्दगंध कवी मंडळ संघाच्या माजी सचिव म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.

दिल्ली येथे झालेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ‘कवी कट्टा’ या निमंत्रित व्यासपीठावर त्यांनी कवितांचे सादरीकरण केले आहे. विविध काव्य, निबंध आणि ओवी स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पुरस्कार मिळविले असून सध्या त्या मंथन कल्चरल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीच्या सचिव म्हणून कार्यरत आहेत.

या कार्यक्रमात त्यांच्या संवेदनशील, जीवनस्पर्शी आणि मातीतल्या सुगंधाने नटलेल्या कवितांचा रसिकांना आस्वाद घेता येणार आहे. तसेच कार्यक्रमानंतर होणाऱ्या खुल्या काव्यसंमेलनात इच्छुक कवींना आपल्या कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे.

या साहित्यिक मेळाव्यास साहित्यप्रेमी, कवी, रसिक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन शब्दगंध कवी मंडळ संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक आलगोंडी आणि सचिव सुधाकर गावडे यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × two =

error: Content is protected !!