मेहंदी व चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
बेळगाव : केळकर बाग येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ‘बेळगावचा कैवारी’ यांच्या रौप्य महोत्सवी (२५ व्या) वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झाली. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मेहंदी स्पर्धा आणि शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या चित्रकला स्पर्धेला शहरातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दोन्ही स्पर्धांमध्ये ७५ हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.
रौप्य महोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांमुळे मंडळाच्या वर्षभर राबविण्यात येणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांना दिमाखदार प्रारंभ झाला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, जनजागृतीपर उपक्रम आणि समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह माऊली महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
यावेळी रौप्य महोत्सवी वर्षाचे अध्यक्ष प्रथमेश परेश शिंदे, उपाध्यक्ष आदित्य मुतगेकर, सरचिटणीस परेश शिंदे, सचिव दीपक ओझा व जय वाके, तसेच कार्यकर्ते आकाश मनूरकर, ध्रुव पालकर, अनिश भालेकर आणि स्वयम पवार उपस्थित होते.
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्याचा संकल्प मंडळाने केला असून, त्याची सुरुवात या स्पर्धांच्या माध्यमातून उत्साहात झाली.
