युवा समितीकडून खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण

युवा समितीकडून खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने खानापूर तालुक्यातील विविध मराठी प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. निट्टूर, यडोगा, तोपीनकट्टी, बिदरभावी, सन्नहोसूर, भंडरगाळी, निडगल आणि बरगाव येथील शाळांमध्ये हा उपक्रम उत्साहात पार पडला.

सीमाभागातील मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी युवा समिती गेल्या नऊ वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. मराठी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि मराठी शाळांतील विद्यार्थीसंख्या वाढण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांना अंकलिपी पुस्तिका, वह्या, पेन, पेन्सिल किट तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

यडोगा येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र खांबले यांनी मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृतीचे अस्तित्व कायम राहील, असे सांगत मराठी शाळा वाचविण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षक पुंडलिक पाटील यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता.

निट्टूर येथे शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष संतोष चोपडे यांनी युवा समितीच्या उपक्रमाचे कौतुक करत मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी समितीचे सदस्य परशराम पाटील, बाळाप्पा नाईक, अमित नार्वेकर, महेंद्र नार्वेकर तसेच शिक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.

मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेच्या जतनासाठी प्रत्येकाने मराठी शाळांच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहणे ही काळाची गरज असल्याचे युवा समितीचे सहकारी शुभम कांबळे यांनी सर्व शाळांमध्ये विद्यार्थी व पालकांशी संवाद साधताना सांगितले.

उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा समिती खानापूरचे श्री पाटील, मुकेश गुरव, शुभम कांबळे, साईनाथ मळीक, प्रसन्न पाटील, कृष्णा खांबले, श्रेयस हल्ल्याळकर आणि चेतन हंगिणकेकर यांनी विशेष सहकार्य केले. या प्रसंगी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग आणि मराठीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 − two =

error: Content is protected !!