कावळेवाडीत गटारकामात लाखोंच्या निधीच्या अपहाराचा आरोप; जाब विचारणाऱ्या नागरिकांना सत्तेची धमकी?

कावळेवाडीत गटारकामात लाखोंच्या निधीच्या अपहाराचा आरोप; जाब विचारणाऱ्या नागरिकांना सत्तेची धमकी?

बेळगाव :
बीजगर्णी ग्रामपंचायत हद्दीतील कावळेवाडी येथे गटाराचे काम पूर्ण झाल्याचे दाखवून लाखो रुपयांचा निधी लंपास केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रत्यक्षात गटाराचे काम अर्धवट अवस्थेत असल्याने पावसाचे पाणी आणि सांडपाणी काही नागरिकांच्या घरात शिरत असून ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

या समस्येबाबत सुमारे महिनाभरापूर्वी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे लेखी अर्ज सादर केला होता. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायत कार्यालयात गेले असता, एका पंचायत सदस्याने नागरिकांशी अरेरावीची भाषा वापरून “पंचायत माझी एकट्याची आहे. मला न विचारता पंचायतमध्ये येऊ नका. काय करायचे ते करा,” अशी धमकी दिल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला आहे. तसेच त्यांनी नागरिकांच्या अंगावर धावून जात दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

यावेळी ग्रामस्थांनी पंचायत विकास अधिकारी (PDO) यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्याविषयीही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याचा दावा नागरिकांनी केला. ही संपूर्ण घटना मानवाधिकार संघटनेचे राज्याध्यक्ष अखिल कांबळे यांच्या उपस्थितीत घडल्याचे सांगण्यात आले.

ग्रामस्थांच्या मते, ग्रामपंचायतीत कोणतेही काम संबंधित व्यक्तींच्या संमतीशिवाय होत नसल्याची चर्चा असून त्यामुळे गटारकामातील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय, हा विषय थांबवण्यासाठी पैशांचे आमिष दाखविण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. मात्र, “भ्रष्टाचाराविरोधातील लढा सुरूच राहील आणि कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही,” अशी भूमिका नागरिकांनी व्यक्त केली.

टीप : या प्रकरणातील सर्व आरोप नागरिकांनी केलेले असून संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बाजू अद्याप समोर आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

20 + 10 =

error: Content is protected !!