तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – युवराज संभाजीराजेंचे आवाहन

तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – युवराज संभाजीराजेंचे आवाहन

बेळगाव, दि. 22 (प्रतिनिधी): अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर येथे २३ सप्टेंबर २०२६ रोजी राजे सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांचे बेळगावातील कॉलेज रोडवरील यश ऑटो दालनात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. दक्षिण भारतातील पहिले मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमाबद्दल साहित्यप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

स्वागत समारंभात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष डॉ. शरद गोरे, युवराज संभाजीराजे भोसले, कवी किशोर टिळेकर आणि अजय साळुंखे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील होते.

यावेळी बोलताना तंजावरचे युवराज संभाजीराजे भोसले यांनी बेळगाव व कर्नाटकातील मराठी बांधवांनी २३ सप्टेंबर रोजी तंजावर येथे होणाऱ्या ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा गौरव वाढवावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उद्योजक महादेव चौगुले यांनी प्रास्ताविकातून तंजावर साहित्य संमेलनाचे महत्त्व अधोरेखित केले. यश ऑटोचे संचालक शिवसंत संजय मोरे यांनी युवराज संभाजीराजे भोसले यांना स्मृतिचिन्ह व राजमुद्रा भेट देऊन गौरव केला. तसेच एशियन मशिन ऑलिम्पिक गेम्स संघटनेचे कर्नाटक राज्याध्यक्ष पै. अतुल शिरोळे यांनीही संघटनेतर्फे त्यांचा सत्कार केला.

यावेळी उद्योजक आप्पासाहेब गुरव आणि राजेंद्र मुतगेकर यांचाही युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

डॉ. शरद गोरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “तंजावर ही दक्षिणेतील मराठी संस्कृतीची पंढरी असून राजे सरफोजीराजे भोसले यांच्या स्मृतीत भरविण्यात येणारे हे साहित्य संमेलन मराठी भाषा, संस्कृती आणि इतिहासासाठी अभिमानाचा क्षण आहे.”

कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि तंजावर यांच्यातील सांस्कृतिक नाते अधिक दृढ करणारा हा ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे. देशभरातील साहित्यिक, संशोधक, इतिहासप्रेमी आणि मराठीप्रेमींनी या संमेलनात सहभागी होऊन राजे सरफोजीराजे भोसले (द्वितीय) यांच्या कार्याचा गौरव करावा आणि मराठी साहित्याचा झेंडा तंजावरच्या भूमीत अभिमानाने फडकवावा, असे त्यांनी आवाहन केले. बेळगावातूनही कार्यकर्ते व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी बेळगावातून मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधी संमेलनासाठी जाणार असल्याचे सांगून उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमास मुख्याध्यापक एम. के. पाटील, रणजित चौगुले, संदीप तरळे, तानाजी पाटील, जिल्हाध्यक्षा अरुणा गोजे-पाटील, कवयित्री पूजा सुतार, स्मिता मेंडके, सविता वेसणे यांच्यासह बेळगाव जिल्हा साहित्य परिषद, शिवसंदेश भारत समूहाचे सदस्य, यश ऑटो परिवार, साहित्यप्रेमी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दक्षिण भारतातील पहिले मराठी साहित्य संमेलन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमातून राजे सरफोजीराजे भोसले यांच्या कार्याचा गौरव होण्याबरोबरच मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक वारशाचा जागर देशभरात घडेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

13 − 1 =

error: Content is protected !!